• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

चिकणपाडा तिहेरी हत्याकांडातील पुरावे पोलिसांच्या हाती?

ByEditor

Sep 9, 2024

संशयाची सुई मयत व्यक्तीच्या भावाकडे, पोलिसांकडून तिघांची कसून चौकशी सुरू

दृश्यम चित्रपट बघून हत्येचा रचला बनाव?

अमूलकुमार जैन
रायगड :
नेरळ चिकणपाडा तिहेरी हत्याकांडाबाबत पोलिसांच्या हाती काही पुरावे लागल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे. या हत्याकांडाबाबत पोलिसांचा संशय हा मयत मदन पाटील याचा भाऊ अर्थात हनुमंत पाटील यावर अधिक घट्ट झाला आहे. घराच्या जागेच्या वादाची या हत्याकांडाला किनार असल्याचे समजते. सदर घटनेबाबत तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलं. पोशिर येथील चिकन पाडा या गावात राहणारे मदन जैतु पाटील आणि त्याची पत्नी व मुलगा असे एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आली होती. दरम्यान, ही हत्या नसून आत्महत्या वाटावी म्हणून आरोपीकडून मृतदेह पाण्यात टाकून बनाव रचण्यात आला होता.

गणेशोत्सवाची धामधूम सगळीकडे सुरू होती. त्याच गणेशोत्सवाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 8 सप्टेंबर रोजी कर्जत तालुक्यातील पोशिर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या चिकनपाडा या गावात तिहेरी हत्याकांडाची घटना समोर आली. येथील ग्रामस्थांना दशक्रियेच्या विधीसाठी जात असताना एका ओढ्यात गावातील आठ वर्षीय विवेक मदन पाटील या तरुणाचा मृतदेह सापडला आणि एकाच कुटुंबातील तीन जणांच्या हत्येची माहिती समोर आली. घटनेची माहिती मिळताच नेरळ, कर्जत, पेण येथील पोलिस अधिकारी यासह जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे घटनास्थळी हजर झाले होते. आई,वडील आणि मुलगा असे पाटील कुटूंब संपले होते. आरोपीने धारदार शस्त्राचा वापर करून तिघांनाही संपवून मृतदेह पाण्यात टाकले होते. मयत अनिशा मदन पाटील ही महिला सात महिन्याची गरोदर होती, तसेच ती आशासेविका म्हणून काम करत होती. गणेशोत्सवाच्या सणाला घडलेल्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला होता.

सदर घटनेत पोलिसांनी तपसाअंती मयत मदन पाटील यांचा भाऊ हनुमंत जैतु पाटील याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. हनुमंत आणि त्याची पत्नी हे गणपती उत्सवाला बाहेर नातेवाईकांकडे गेले होते असे सांगण्यात आले. मात्र हनुमंतच्या माहितीत पोलिसांना सतत तफावत जाणवत होती. पोलिसांनी केलेल्या चौकशीत काही पुरावे हाती लागले होते. सदर घटनेच्या ठिकाणी पोलिसांनी श्वानपथक, फॉरेन्सिक पथक बोलावली होती. दरम्यान, पोलिसांना हनुमंत हा ज्या नातेवाईकांकडे गेला होता तिथे चौकशी केली असता तिथेही पोलिसांना हनुमंतच्या विरोधात माहिती समोर आली होती. हनुमंत हा नातेवाईकांकडे काही तासच होता. नंतर तो सकाळी आल्याचे सांगण्यात आले होते. एकूणच पोलिसांचा संशय हा अधिकच हनुमंतच्या विरोधात गेल्याचे चित्र समोर आले होते.

दरम्यान आज 9 सप्टेंबर रोजी पोलिसांना काही पुरावे हाती लागल्याची खात्रीशीर माहिती समोर येत आहे. ज्या घरात तिघांचा खुन करण्यात आला तिथे पोलिसांना कुठल्याही प्रकारचा रक्तस्त्राव आढळून आला नव्हता. तिघांची हत्या एखाद्या धारदार शस्त्राने होत आहे तर रक्ताचे पाट वाहणे गरजेचे होते, परंतु काही थेंब पोलिसांना घराच्या भिंतीवर दिसून आले. आता याच घटनेतील काही पुरावे पोलिसांना बुडालेल्या ओढ्यात कापडी कपडे स्वरूपात हाती लागले आहेत. त्यामुळे हे सारे काही हनुमंत करू शकतो असा संशय पोलिसांना आहे. मयत मदन आणि भाऊ हनुमंत यांचे सतत राहत असलेल्या घरावरून वाद होत होते. गेली चार महिने हा वाद वाढला होता. राहते घर मदनच्या नावे होते. त्यातील अर्धे घरपट्टी आपल्या नावे कर म्हणून हनुमंत भावाकडे मागणी करीत होता. घरपट्टी नावे नसल्याने हनुमंतच्या कुटुंबाला कुठल्याच सोयीसुविधा, शासनाच्या योजनेचा लाभ मिळत नव्हता. रेशनकार्ड देखील त्याच्याकडे नव्हते आणि त्यामुळेच हा वाद होवुन हनुमंतने हे हत्याकांड घडवून आणले असावे म्हणून चर्चा सुरू आहे.

सदर घटनेचा तपास नेरळ पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग हे संयुक्तपणे करीत आहेत. त्यातच पोलिसांच्या आणखी एक महत्वाची गोष्ट समोर आली की हनुमंत ह्याला गुन्ह्यावरील चित्रपट बघण्याची सवय आहे. अजय देवगणचा आलेला चित्रपट दृश्यम हा चित्रपट हनुमंत गेली काही महिने सतत पाहत होता आणि त्याच चित्रपटाचा आधार घेत त्याने हा खेळ रचला आहे का? याबाबत तपास करण्यात येत आहे. सुरुवातीला आपल्या पत्नीला गणपतीसाठी बाहेर पाठवणे नंतर त्याचा बनाव रचणे हा सर्व खेळ आता पोलिसांच्या समोर आल्याचे समजते आहे. परंतु, आरोपीने वापरलेले मुख्य धारदार शस्त्र पोलिसांच्या हाती लागत नसल्याने पोलिसांसमोर एक आव्हान उभे राहिले आहे. काही पुरावे पोलिसांच्या हाती लागले असून लवकरच या खुनाचा तपास लागण्याची शक्यता आहे. खुनातील चौकशीसाठी पोलिसांनी हनुमंत पाटील आणि त्याच्या पत्नीला ताब्यात घेतले असून हनुमंताच्या एका मित्राला देखील ताब्यात घेण्यात आले आहे.

एकूणच घटनेतील आरोपी म्हणून पोलिसांची संशयाची सुई ही हनुमंत याच्याकडे अधिक दिसत असून खुनाचा उलगडा हा लवकरच लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!