• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

आली गौराई अंगणी…तिला लिंबलोण करा!

ByEditor

Sep 10, 2024

रोह्यात गावोगावी माहेरवाशीण गौराईचे आगमन

शशिकांत मोरे
धाटाव :
माहेरपणासाठी येणाऱ्या गौराईचे म्हणजेच गौरीचे लिंबलोण उतरवून स्वागत केले जाते. आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्याचे असे स्वागत करण्याची परंपरा आहे. विशेषतः घरी येणारी पाहुणी जर माहेरवाशीण असेल, तर तिचे कौतुकही खास वेगळेच. त्यामुळे आज माहेरी येणाऱ्या गौरीचे म्हणजेच देवी पार्वतीचे रोह्यात गावोगावी भव्यदिव्य स्वागत करण्यात आले.

गणेशाचे आगमन झाल्यानंतर लगेचच गौरीचा सण येतो. भाद्रपद शुद्ध पक्षाच्या ज्येष्ठ नक्षत्रावर उद्या गौरींचे पूजन केले जाणार आहे म्हणून त्यांना ज्येष्ठागौरी असेही म्हटले जाते. गौरींचे अनुराधा नक्षत्रावर आवाहन, ज्येष्ठ नक्षत्रावर पूजन आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन केले जाते. म्हणजेच संध्याकाळ दरम्यान गौरी घरी आणल्या जातात, आजच्या दिवशी पूजन केलें जाते आणि तिसऱ्या दिवशी विसर्जन केले जाते.

घरोघरी कुलाचाराप्रमाणे वेगवेगळे गौरीपूजन केले जाते. काही ठिकाणी उभ्या, मातीच्या किंवा धातूच्या (मुखवटे) गौरी असतात. काही ठिकाणी नदीतील पाच किंवा सात खडे आणून गौरींचे पूजन केले जाते. खडे आणताना मागे वळून पाहायचे नाही, असे सांगितले जाते. खडे एखाद्या कलशात ठेवून त्याचे पूजन केले जाते. काही घरांमध्ये तांब्याच्या भांड्यावर मुखवटे रेखाटून गौरीपूजनाची परंपरा आहे. काही घरांमध्ये तेरड्याच्या झुडुपाची गौरी म्हणून पूजा केली जाते. मुखवट्याच्या गौरीचे आवाहन करताना हे मुखवटे तबकामध्ये ठेवले जातात. तसेच त्यावर वस्त्र पांघरले जाते.

गणेशोत्सवात सोन्याचे दागिने वापरण्याची परंपरा लोप वापत असतानाच यंदा महिलांनी मोठ्या प्रमाणात इमिटेशन दागिने खरेदीवर भर दिलाय. त्यामुळे बाजारातून आणलेल्या मुखवट्याना ज्वेलरीचा साज चढविला गेलाय. आपल्या आनंदाचा पारावर गगनात मावत नसताना महिला वर्ग मोठ्या हौसेने पारंपारिक गीते गात आपल्या घरी गौराईना वाजत गाजत आणताना पहायला मिळाल्या. गौराईचे गावोगावी, दारोदारी स्वागत होत असताना औक्षण सुद्धा केले जात होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!