प्रतिनिधी
महाड : सोमवार, दि. 9 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी अडीच वाजण्याचे सुमारास अनंत सिताराम कोतवडेकर (वय 76, रा. खोपोली) खोपोली इथून माणगाव येथे उतरले होते. सणाचे अनुषंगाने गाड्यांना गर्दी असल्याने माणगाववरून ते महाड स्टँड येथे उतरले. त्यांना चिपळूण येथे जायचे असल्याने महाड येथून रिक्षा पकडून ते महामार्गावर चांभारखिंड येथे उतरले होते. तेव्हा त्यांची बॅग चुकुन रिक्षात राहिली होती. सदर बॅगमध्ये 50 हजार रुपयांची रक्कम होती. तसेच त्यांचे बँकेचे व काही महत्त्वाचे कागदपत्र होते.
सदर गृहस्थ हे त्यांचे नातेवाईक मुंबई पोलीसमध्ये कार्यरत असलेले ओमकार सातांबेकर यांचे सोबत महाड शहर पोलीस ठाण्यात आले असता तेथील ठाणे अंमलदार गणेश पवार यांनी पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांना माहिती देऊन त्यांचे मार्गदर्शनाने महाड येथील वंचित बहुजन माथाडी कामगार युनियन रिक्षा संघ अध्यक्ष शेखर महाडिक यांचेशी संपर्क साधून हवालदार गणेश पवार, चालक अजय होळकर यांनी घटनास्थळी जावून सदर बॅगचा शोध घेतला असता सदरची बॅग रिक्षा चालक गणेश करवडे यांचे रिक्षात ठेवली होती. ती बॅग रिक्षा संघटना अध्यक्ष महाडीक व रिक्षा चालक गणेश करवडे यांनी आणून ती वयस्कर गृहस्थ अनंत सीताराम कोतवडेकर यांचे ताब्यात दिली. सदर बॅगमध्ये 50 हजार रुपये होते, ते त्यांना मिळाल्याने अनंत सीताराम कोतवडेकर यांनी पोलिसांचे व रिक्षा संघटना अध्यक्ष व रिक्षा चालक यांचे आभार मानले आहेत.
