नातेवाईकांसह ग्रामस्थांची मागणी
गणेश पवार
कर्जत : नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील चिकनपाडा येथे दि. ७ सप्टेंबर २०२४ रोजी रात्रीचे सुमारास मदन पाटील, गरोदर पत्नी अनिषा पाटील व मुलगा विवेक पाटील यांची झोपेत असताना हत्या झाल्याची घटना घडली होती. सदर तिहेरी हत्याकांडाची घटना ही दि. ८ सप्टेंबर २०२४ रोजी उघड झाल्याने या तिहेरी हत्याकांडासंदर्भात मयत अनिषा पाटील हिचा भाऊ रुपेश यशवंत वेहले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नेरळ पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नं. १८४ /२०२४ भारतीय न्याय सांहीता २०२३चे कलम १०३ (१), २३८ अन्वये गुन्हा नेाद करून पोलीस तपासात या तिहेरी हत्याकांडातील आरोपीस मयत मदन पाटील यांचा सख्खा लहान भाऊ हणमंत पाटील याला मुख्य संशयित म्हणून चौकशीसाठी ताब्यात घेतले असता सदर तिहेरी हत्याकांड त्यांनी केल्याची कबूली दिल्याने नेरळ पोलीस व गुन्हे अन्वेषण विभाग अलिबाग यांनी त्याला अटक केली आहे. तर आरोपी हणमंत पाटील याला फाशी द्या अशी मागणी मयत यांचे नातेवाईक व ग्रामस्थांकडून निवेदनामार्फत मागणी करण्यात आली आहे.

कर्जत तालुक्यातील पोशिर ग्रामपंचायत हद्दीतील चिकनपाडा येथे घरात गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना दिवशी रात्रीचे सुमारास एकाच कुटूबातील पती, सात महिन्याची गरोदर पत्नी व आठ वर्षाचा मुलगा यांची घरात हत्या करून सदर मृतदेह घराशेजारील ओहळात टाकण्यात आल्याची घटना समोर आली असल्याने, सदर हृदयदाह घटनेची माहिती सर्वत्र पसरताच कर्जतसह राज्यात क्रुरपणे झालेल्या तिहेरी हत्याकांडासंदर्भात हळहळ व राग व्यक्त करण्यात येत होता. या तिहेरी हत्याकांडासंदर्भात नेरळ पोलीस ठाण्यात माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तिहेरी हत्याकांडप्रकरणी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी धुळा टेळे यांच्या मुख्य अधिकाराखाली पोलीसांच्या पाच टीम तसेच अलिबाग गुन्हे अन्वेषण पथक यांच्या माध्यमातून तपासाची सुत्रे ही वेगाने फिरवत सदर तिहेरी हत्याकांडप्रकरणी मुख्य संशयीत म्हणून मृत मदन पाटील यांचा लहान भाऊ हणमंत पाटील याला पोलीसांनी चौकशीकरीता ताब्यात घेत चौकशी केली असता, मयत मोठा भाऊ हा राहते घरामध्ये त्याचा हिस्सा नावे करु देत नसल्याने व रेशनकार्ड नावे करून देत नसल्याने आमच्यात वाद होत असल्याने व काही वर्षापुर्वी याच कारणावरुन भांडण झाले होते. त्यावेळी त्यांनी पोलीसांत तक्रारी दिल्या होत्या. भविष्यात राहते घराचा हिस्सा नावे करुन देणार नाही म्हणून त्यानाच संपविण्याचा मनात निर्धार करून, ते झोपेत असताना कु्ऱ्हाडीने वार करून मृतदेह घराच्या मागील बाजूस वाहणाऱ्या ओहळामध्ये टाकल्याचे कबुल केले आहे.
सदर हत्याकांडातील आरोपी हणमंत पाटील याला पोलीसांनी न्यायालयात हजर केले असता, त्याला सात दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान, या तिहेरी हत्याकांडातील मयत मदन पाटील, त्यांची गरोदर पत्नी अनिशा आणि आठ वर्षीय मुलगा विवेक यांचे नातेवाईक व ग्रामस्थांनी मंगळवार, दि. १० सप्टेंबर रोजी नेरळ पोलीस ठाणे गाठून आरोपी हनुमंत यास फाशीची शिक्षा झाली पाहिजे. तसेच या गुन्ह्यात आणखी सह आरोपी आहे का याचा शोध घेऊन त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे अशी मागणी नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्याकडे निवेदन देत केली आहे.
