गणेश दर्शनाकरिता लाडू मोदक आणण्यापेक्षा शालोपयोगी वह्या पुस्तकं आणा -डॉ . राजाराम हुलवान
अमुलकुमार जैन
रायगड : माणुसकी प्रतिष्ठान जितनगर वायशेत अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान यांच्या संकल्पनेतून दरवर्षी निर्मल गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. या अंतर्गत मातीची गणेशमूर्ती बनवणे, कृत्रिम तलावात गणेश विसर्जन करणे, निर्माल्य संकलन करून त्याचे खत बनविण्याकरिता वापर करणे तसेच प्लास्टिक मुक्तीचा नारा देत प्लास्टिक मुक्त भारत कसा होईल यावर विशेष भर देणे व त्यातूनच पर्यावरणाचे संरक्षण करणे व त्याचा समतोल राखणे इत्यादी संकल्पना राबविल्या जातात.
चालू वर्षात या उपक्रमात एक नावीन्यपूर्ण आणि समाजोपयोगी संकल्पना राबवित असताना गणेश दर्शनाकरिता येणाऱ्या भाविकांनी प्रसाद, लाडू, मोदक आणण्यापेक्षा वह्या, पेन्सिल असे शालोपयोगी वस्तू आणा जेणेकरून दात्यांनी दिलेल्या या वस्तूंचा उपयोग समाजातील गरीब, गरजू विद्यार्थ्यांना होईल. ज्यामुळे त्यांच्या काही प्रमाणातील गरजा भागवून समाजातील या गरजूंना थोडा हातभार लागेल असे मत यावेळी डॉ. हुलवान यांनी व्यक्त केले. तसेच अशा सामाजिक कार्यात समाजातील दानशूर लोकांनी पुढे येवून समाजाप्रती आपले कर्तव्य बजावण्यास पुढे सरसावले पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले.
याचेच प्रतीक म्हणून लायन्स मांडवा माजी अध्यक्ष लायन मोहन पाटील व लायन अजय आंगणे यांनी गणपती बाप्पाला प्रसाद म्हणून वह्यांची भेट देवून एक आदर्श समोर ठेवला. येथे जमलेल्या वह्या, पुस्तकं, पेन्सिल हे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना वाटण्यात येणार असल्याची माहिती डॉ. राजाराम हुलवान यांनी यावेळी दिली.
