क्रीडा प्रतिनिधी
रायगड : महाराष्ट्र क्रिकेट असोसीएशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या पंधरा वर्षांखालील मुलींच्या आंतरजिल्हा निमंत्रित निवड चाचणी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील महाडच्या रोशनी पारधी हिने हिंगोली संघाविरूद्ध खेळताना दमदार शतक ठोकले आहे. अवघा ७८ चेंडूंचा सामना करत २४ चौकार आणि २ षटकार खेचत तिने नाबाद १३६ धावा केल्या.
रायगड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना १९ षटकांनमध्ये एक गडी गमावत २०२ धावा धावफलकावर नोंदवल्या. सलामीला आलेल्या कर्णधार रोशनी पारधी व स्नेहल पवार यांनी धुवांधार फलंदाजी करत पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. स्नेहल पवार हिने १४ धावा काढत रोशनीला जास्तीतजास्त फलंदाजी करण्यास दिली. पहिल्या विकेटनंतर अनिश्का वर्मा हिने दुसऱ्या बाजूने रोशनीला साथ देत नाबाद २४ धावा काढल्या. १९व्या षटकाच्या समाप्तीनंतर पावसाने हजेरी लावली व त्यानंत सामना अनिर्णीत घोषित करण्यात आला. रायगडच्या संघाने पहिल्याच साखळी सामन्यात दमदार सुरुवात केली असल्याने जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, सचिव प्रदिप नाईक, सहसचिव बशीर चीचकर, रोशनी पारधीचे प्रशिक्षक आवेश चीचकर यांच्यासह सर्व पदाधिकारी, सदस्य, खेळाडू यांनी रोशनीचे व सर्व संघाचे अभनंदन केले आहे.
