शशिकांत मोरे
धाटाव : रोहा तालुक्यात धाटाव परिसरातील पाच दिवसाच्या आपल्या लाडक्या देव बाप्पाला भक्तिमय वातावरणात भावपूर्ण निरोप देण्यात आला. टाळ, मॄदुंगाच्या गजरात गणेशभक्तांनी पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत आपल्या आवडत्या बाप्पाला निरोप दिला. यावेळी गावातील ज्येष्ठ श्रेष्ठांसह महिला, तरुणवर्गाने विसर्जन स्थळावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

आज पावसाने उसंत घेतल्याने पाच दिवसाच्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी गणेशभक्तांमध्ये उत्साह पाहण्यास मिळाला. सायंकाळी ५ नंतर गावातून वाजत गाजत काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकित टाळ, मॄदुंगाच्या तालांवर गणपतींचे विसर्जन करण्यासाठी गर्दी उसळली होती. एका मागुन एक घरगुती गणपती विसर्जनासाठी कुंडलिका नदीच्या तीरावर निघाले होते. विसर्जनासाठी भक्तगणांनी मोठी गर्दी केली होती.

गणेशभक्तांनी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असे गजर तर महिलांनी पारंपारिक गीतांतून आपल्या लाडक्या बाप्पाला आळवणी केली. आपल्या बाप्पांचे भावपुर्ण आणि भक्तीमय वातावरणात विसर्जन करताना तरुण वर्ग, महिला, ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ यांचा उत्साह पहावयास मिळाला. तर बाप्पाला अखेरचा निरोप देताना लहान मुलांना अश्रू अनावर झाल्याचे पहावयास मिळाले. विसर्जनस्थळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
