• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक निर्विघ्न, एकही अपघात नाही!

ByEditor

Sep 13, 2024
संग्रहित

मात्र माणगावात वाहतूक कोंडीचे विघ्न

मजिद हजिते
माणगाव :
कोकणातील दिड आणि पाच दिवसांच्या गणपतींचे आगमन होऊन विसर्जनही सुरळीत पार पडले. मुंबईहून कोकणात येताना आणि जाताना गणेश भक्तांना काही ठिकाणी खड्ड्यांचा सामना करावा लागला. मात्र वाहतूक सुरळीत सुरू असल्याने सुदैवाने एकही अपघाताची नोंद झालेली दिसत नाही. महामार्गावर वाहतूक निर्विघ्न होत असताना माणगावमध्ये मात्र वाहतूक कोंडीचे विघ्न कायम आडवे येत आहे. मुंबईला ये – जा करताना माणगाव येथील वाहतूक कोंडीने गणेशभक्त तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.

गणेशोत्सवाच्या आगमनापुर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांचा पनवेल ते महाड असा पाहणी दौरा केला होता. त्या दौऱ्यात कॉन्ट्रॅक्टर आणि प्रशासनाला धारेवर धरले होते. तर संबंधित कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर थेट गून्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर माणगाव पोलिस ठाण्यात गून्हा दाखल करण्यात आल्यानंतर प्रशासन, पोलिस आणि ठेकेदार खडबडून जागे झाले. महामार्गावर भरपावसात दिवस रात्र खड्डे बुजविण्यासाठी कार्यवाही सुरू झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्या अगोदर मुंबई गोवा महामार्ग होण्यासाठी माणगावमध्ये सहा दिवस आमरण उपोषण सुरू होते. त्याची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा दौरा केला होता.

पनवेल ते माणगाव या ९० किमी अंतरात पाच ठिकाणी एकाचवेळी खड्डे भरण्यासाठी काम सुरू झाले. बहुतांश ठिकाणी खड्डे आधुनिक तंत्रज्ञानाने भरले. त्यामुळे गणेशभक्तांनी समाधान व्यक्त केले. इंदापूर, माणगाव आणि लोणेरे येथे वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक पोलीस, सामाजिक कार्यकर्ते आणि स्वयंसेवक ठिकठिकाणी तैनात करण्यात आले. मात्र, माणगाव शहरातील महामार्गाचे रुंदीकरण झालेले नाही, इंदापूर आणि माणगाव या बायपासचे काम रखडले आहे. तसेच लोणेरे उड्डाण पूल तयार नसल्याने इंदापूर, माणगाव आणि लोणेरे या २० किमी अंतरात सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे वाहनांच्या २ ते ३ किमीच्या रांगा लागतात. इंदापूर ते लोणेरे येथे जाण्यासाठी दोन ते तीन तासाचे विघ्न येत आहे. माणगावच्या काळ नदीवरील नवीन पुलाचे काम कासवगतीने सुरू आहे. त्याचे काम पावसाळ्यात थांबले आहे. त्यामुळे काळ नदी पुलावरून एकेरी वाहतूक होत असल्याने संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे वाहनांच्या रांगा दिसत असतात.

यावेळीही वाहनचालकांना पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे. खोपोली,पाली, निजामपूर मार्गे माणगाव, खरवली फाटा , गांगवली, पाचाड, पुणे असे विविध मार्ग कोकणात जाण्यासाठी उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे माणगाव वगळता वाहतूक सुरळीत होण्यासाठी मदत झाली आहे.

विशेषतः या काळात गणपतीच्या कृपेने पावसाची अवकृपा झाली नाही. त्यामुळे खड्डे दुरुस्तीस साक्षात गणपती बाप्पाची छत्रछाया उपयोगी पडली आहे. तसेच भक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी मदतच झाली आहे अशी भावना गणेश भक्तांनी व्यक्त केल्या. या मार्गावर सुमारे १५० ते २०० स्वयंसेवक, वाहतूक पोलीस, पोलिस मित्र पोलीसांच्या हाकेला धावून आले. त्यांनी वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. ठिकठिकाणी तात्पुरती प्रवाशांच्या सेवेसाठी पोलीस मदत केंद्र उभारण्यात आले आहेत. अशी सर्व प्रकारची सक्षम यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्याने सुदैवाने गेल्या १५ दिवसांत एकही अपघात झाला नाही.

रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतूक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे, पोलिस मुख्यालयातील अधिकारी, पोलिस कर्मचारी, ठिकठिकाणचे पोलिस निरीक्षक, वाहतूक पोलीस, स्वयंसेवक, पोलिस मित्र, सामाजिक संघटना, रिक्षा आणि वाहतूक संघटना यांनी उत्कृष्ट आणि उत्तम सहकार्य केल्याने गणेश भक्तांचा प्रवास निर्विघ्नपणे पार पडला आहे आणि यापुढेही सुखकर करण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जाणार आहेत असा दावा पोलिसांनी केला आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!