• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

सावधान …! उरणमध्ये फिरत आहेत बनावट नोटा?

ByEditor

Sep 13, 2024

घन:श्याम कडू
उरण :
उरणमध्ये बनावट नोटांचा सुळसुळाट झाला आहे. कोणाकडून तरी आलेली बनावट नोट सर्वसामान्य नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे. उरणमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून बनावट नोटा आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. या बनावट नोटा वापरणारी टोळी उरण परिसरात फिरत आहे. सुटे पैसे मागण्याचा बनाव करून खोटी नोट देऊन फसवले जाते. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून याबाबत अधिकृत माहिती मिळत नाही.

ऐन गणेशोत्सवात बनावट नोटा मोठ्या प्रमाणात वठविल्या जात आहेत. विशेष म्हणजे गणेशोत्सवात जागरण करताना सुरू असलेल्या पत्त्याच्या खेळात मोठ्या प्रमाणात बनावट नोटांचा वापर केला जात असल्याचे समजते. १० हजाराच्या खऱ्या नोटा दिल्यानंतर १ लाख बनावट नोटा मिळत असल्याची चर्चा उरणच्या जनतेत सुरू आहे. याला वेळीच आळा घातला नाही तर लाखों रुपयांच्या बनावट नोटा चलनात येऊन व्यापारी व सर्वसामान्य जनतेची फसवणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये राजकीय पक्षाचे पदाधिकारी सामील असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचे बोलले जात आहे. तर इतर राजकीय पक्ष व त्यांचे पदाधिकारी याविरोधात आवाज उठवीत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

बनावट नोट सामान्य माणसाला लगेच ओळखू येत नाही. बँकेमध्ये पैसे भरण्यासाठी गेल्यानंतर अनेकांना तुमची ही नोट बनावट आहे असे अधिकारी सांगतात. त्या नोटेवर लाल रंगाच्या पेनने फुली मारून संबंधिताचे नाव पत्ता घेऊन बनावट नोट जमा करण्याचे काम बँकेचे अधिकारी करतात. राष्ट्रीयकृत बँकेतील अधिकारी तर अशी नोट फाडूनच टाकतात. ग्राहकाने नोट परत मागितली, तरी दिली जात नाही. त्याचा आर्थिक तोटा होत असतानाच अधिकारी अरेरावीच्या भाषेत ‘पंचनामा करून फिर्याद देऊ का’, असा दम देतात. त्यामुळे सामान्य माणूस निमूटपणे हा प्रकार सहन करतो.

पोलिसांनी व्यापाऱ्यांना व सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास वाचवण्यासाठी बनावट नोटा बाजारात आणणाऱ्या टोळीचा तपास करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. बनावट नोटांना आळा घातला नाही, तर गुन्हेगारांचे चांगलेच फावून निरपराध लोक अडचणीत येण्याची शक्यता आहे. बनावट नोटांमध्ये पाचशे, शंभर अशा नोटांचा समावेश आहे. सणासुदीच्या दिवसामध्ये उरणमध्ये बनावट नोटा बाजारात आणणारी टोळी फिरते,असा संशय व्यक्त होत आहे. पोलिस यंत्रणेकडे या गुन्हेगारांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!