सलीम शेख
माणगाव : एसटी बसची पाठीमागून दुचाकीला धडक लागून झालेल्या अपघातात २ जण जखमी होऊन दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. सदरील अपघात गुरुवार, दि. १२ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ४:३० वाजण्याच्या सुमारास माणगाव येथील हॉटेल कार्तिकजवळ मुंबई-गोवा महामार्गावर घडला. या अपघाताची फिर्याद मंदार शंकर भद्रिके (वय ३०, रा. जोर, ता. माणगाव) यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
सदर अपघाताबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि,अपघाताच्या गुन्ह्यातील आरोपी एसटी बस चालक देविदास पुंडलिक चव्हाण (वय ३४, रा. बस डेपो, खेड, जि.रत्नागिरी) यांनी त्यांच्या ताब्यातील नालासोपारा ते खेड हि एसटी बस क्र. एमएच ०८ एपी ५८२५ हि गाडी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाने भरधाव वेगाने चालवीत घेऊन जात असताना पाठीमागून बुलेट मोटारसायकल क्र. एमएच ४७ एम २६१५ या गाडीला धडक दिल्याने अपघात घडला. या अपघातात दुचाकीवरील शंकर नामदेव भद्रिके (वय ७०) व अंकुश शंकर भद्रिके (वय ३०) दोन्ही रा.जोर, ता. माणगाव हे दोघे जखमी होऊन दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात गु.रजि.नं.२०७/२०२४ भादवी संहिता कलम २८१,१२५ (ए)१२५(ब) महाराष्ट्र मोटारवाहन अधिनियम १८४ प्रमाणे करण्यात येऊन एसटी बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर अपघाताच्या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सानप हे करीत आहेत.
