गणेश पवार
कर्जत : खांडा प्रभागातील नेरळ-ममदापूर, भडवळ या मुख्य रस्त्याच्या कडेला नेरळ ग्रामपंचायतीने आर्थिक निधी खर्च करून बांधलेली कचराकुंडी तेथील असलेल्या पाणीपुरीवाल्याच्या स्वार्थापोटी नेरळ ग्रामपंचायतीचा राजीनामा दिलेल्या माजी सदस्याने कंत्राटी कामगार घेवून तोडून टाकली आहे का? असा सवाल उपस्थित करत, नेरळ शहर मनसेने उपोषणाचा इशारा दिला आहे.
कर्जत तालुक्यातील मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या व सध्या आर्थिक परस्थिती ढासळलेल्या व सदस्यांनी दिलेल्या राजीनामा यासह नागरी सुविधा पुरविण्यास अथवा नागरी समस्यांविषयी चर्चेत असलेल्या नेरळ ग्रामपंचायतीने दोन वर्षापूर्वी मोठ्या प्रमाणावर आर्थिक निधी खर्च करून नेरळ गावातील प्रभागांमध्ये सिमेंट वीटांचे बांधकाम करून कचरा कुंड्या बांधल्या होत्या. त्यापैकी खांडा गावातील कचरा कुंडी ही राजीनामा दिलेले माजी सदस्य हे आपल्या कंत्राटी कामगारांना सोबत घेऊन तोडत असल्याने व गणेश उत्सव सुरू असताना कचराकुंडी तोडली जात असल्याने, मनसेचे नेरळ शहर उपाध्यक्ष तथा स्थानिक ग्रामस्थ सुभाष नाईक यांनी कचराकुंडी कशासाठी तोडली जात आहे, अशी विचारणा केली असता नव्याने बांधण्यासाठी तोडली जात असल्याचे सांगण्यात आले. मात्र, नेरळ ग्रामपंचायतमधील खांडा प्रभागातील नेरळ-ममदापूर-भडवळ या मुख्य रस्त्याच्या कडेला नेरळ ग्रामपंचायतीने आर्थिक निधी खर्च करून बांधलेली कचराकुंडी ही तेथील असलेल्या पाणीपुरीवाल्याच्या स्वार्थापोटी स्थानिक ग्रामस्थांची गैरसोय करून नेरळ ग्रामपंचायतीचा राजीनामा दिलेले माजी सदस्याने कंत्राटी कामगार घेवून तोडून टाकली आहे का? असा प्रश्न उपस्थित करत, पुढील आठ दिवसात त्याच ठिकाणी नव्याने कचराकुंडी बांधण्यात यावी आणि नवीन कचराकुंडी बांधण्यासाठी आलेला खर्च हा चांगल्या स्थितीत असलेली कचराकुंडी तोडण्यासाठी कामगार लावणार्या माजी सदस्यांकडून वसूल करून, नेरळ ग्रामपंचायतीने आर्थिक निधी खर्च करून बांधलेली कचराकुंडी त्याच ठिकाणी उभारली नाही तर ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर उपोषण करण्याचा नेरळ ग्रामपंचायतीला निवेदनाच्या माध्यमातून मनसेचे नेरळ शहर उपाध्यक्ष तथा स्थानिक ग्रामस्थ सुभाष नाईक यांनी इशारा दिला आहे.
सदर कचरा कुंडी ही पाणीपुरीवाल्याला खुश करून, स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी कोणालाही ती कचराकुंडी तेथून हलवून देणार नाही. तोडण्यात आलेल्या कचराकुंडीबद्दल नेरळ ग्रामपंचायतीकडून माहिती नसल्याचे सांगण्यात येत असल्याने, नेरळ ग्रामपंचायतच्या मालकीची कचराकुंडी तोडणार्या संबंधित व्यक्ती विरोधात शासकीय मालमत्तेचे स्वतःच्या फायद्यासाठी नुकसान केले असल्याने, नेरळ ग्रामपंचायतीने नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावा.
-सुभाष नाईक
ग्रामस्थ तथा नेरळ शहर उपाध्यक्ष, मनसे.
