क्रीडा प्रतिनिधी
रायगड : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित पंधरा वर्षाखालील मुलींची आंतरजिल्हा निमंत्रित निवड चाचणी क्रिकेट स्पर्धा पुणे येथे सुरू आहे. त्यामध्ये रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मुलींनी चमकदार कामगरी करत साखळी फेरीत अव्वल स्थान प्राप्त करुन आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच सुपर लीगमध्ये दिमाखात प्रवेश मिळवला आहे.
एमसीएच्या स्पर्धेपूर्वी जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने ३ प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, त्याचा फायदा संघाला झाला. रायगडच्या संघाची कर्णधार रोशनी पारधी हिने लागोपाठ दोन शतके झळकावली असून तीनही सामन्यात आपल्या धुवाँधार फलंदाजीने एकूण ३०१ धावा काढून संघाला एक हाती विजय मिळवून दिला. रायगड संघाने सांगली व सिडीए क्लब विरूद्ध विजय मिळवला तर हिंगली संघाविरूद्ध पावसामुळे सामना अनिर्णीत राहिला व दोन्ही संघाला एक गुण देण्यात आला. ग्रुप ‘सी’मध्ये रायगडच्या संघाने अव्वल स्थान प्राप्त केले आहे. लवकरच सुपर लीग फेरीतील सामने सुरू होतील. जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने संघाला नवीन किट व स्टार फलंदाज रोशनी पारधी हिला इंग्लिश विल्लो बॅट बक्षिस म्हणून जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध पाटील यांनी जाहिर केले आहे. संपूर्ण संघाचे व प्रशिक्षकांची जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने अभिनंदन करण्यात आले आहे. येणाऱ्या क्रिकेट हंगामात मुलींच्या क्रिकेटकडे आपण विशेष लक्ष देऊन मुलींच्या विविध वयोगटातील क्रिकेट स्पर्धा व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
