क्रीडा प्रतिनिधी
रायगड : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मुख्य लेखी पंच परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या रायगड जिल्ह्यातील पंचाना मार्गदर्शन करण्यासाठी माऊली हाॅल उरण येथे मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. दि. २१ व २२ सप्टेंबर रोजी पुणे-गहूंजेच्या एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर क्रिकेट पंचांची प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येणार आहे. ह्या परीक्षेच्या तयारीसाठी ह्या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील यांच्या प्रेरणेतून व प्रसिद्ध प्रशिक्षक नयन कट्टा यांच्या पुढाकाराने शिबिरामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी माजी रणजीपटू व विद्यमान बीसीसीआयचे पंच हर्षद रावले, एमसीएचे पंच राजन कसबे उपस्थित होते. संपूर्ण दिवस परीक्षार्थीची प्रात्यक्षिक परीक्षेची उत्तम तयारी करून घेण्यात आली. प्रात्यक्षिक शिबिरामध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी रायगड जिल्ह्यातील उरणचे प्रशांत माळी, रोहन पाटील व वरुण म्हात्रे, पनवेलचे विघ्नहर्ता मुंढे, निशांत माळी, अलिबागचे अभिजित वाडकर, पेणचे सागर मुळे हे पंच उपस्थितीत होते. कार्यक्रमासाठी आरडीसीएचे उपाध्यक्ष राजेश पाटील, ॲड. पंकज पंडित, उरण क्रिकेट असो.चे सदस्य नरेंद्र मयेकर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत माळी, रोहन पाटील यांनी परिश्रम घेतले तर डी. के. भोईर यांनी हाॅल विनामूल्य दिल्याबद्दल सर्वांनी त्यांचे आभार मानले आहेत.
