दादर ग्रामस्थांनी खासदार धैर्यशील पाटील यांना दिले निवेदन
विनायक पाटील
पेण : पेण तालुक्यातील दादर गावातील २३०० एकर व रायगड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यची शेत जमीन कांदळवनाणी व्यापली आहे. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग ही एकेकाळची शेत जमीन आज वन विभागाचा एक भाग म्हणून पाहत आहे.असे दादर ग्रामस्थांनी खासदार धैर्यशील पाटील, वैकुंठ पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले. सन १८८९ च्या महापुरात दादर गावाचे बंदिस्ती तुटली आणि शेती उध्वस्त झाली. शेतकऱ्यांनी बंदिस्ती बांधण्यासाठी अनेकदा प्रयत्न केला पण हे काम शेतकऱ्यांच्या कुवतीच्या बाहेर होते. सरकारला विनंती केली परंतु सरकारने कोणतीही मदत केली नाही किंवा बंदिस्ती बांधण्यासाठी कोणती योजना राबविली नाही. परिणामी कांदळवणाची वाढ होत गेली व पिकती शेती नापीक झाली.रिलायन्स कंपनीच्या माध्यमातून झेजच्या नावाखाली काही शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी केल्या गेल्या. खरेदी केलेल्या जमिनी सलग एका बाजूला नाहीत. शेतकऱ्यांच्या जमिनी आणि कंपनीने खरेदी केलेल्या जमिनी सरमिसळ आहेत. अशा स्थितीत शेतकऱ्यांना आपल्या जमिनी कांदळवन आणि खारेपाणी यापासून वाचवणे कठीण झाले आणि शेती करणे दुरापष्ट झाले असून सुमारे ३० वर्षांपूर्वी भाताचे कोठार असणारे दादर गाव आता कांदळवणाचे कोठार बनले आहे. त्यामुळे ग्रामस्थांना उपजीविकेसाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे.

विभागात अतिवृष्टी झाल्यास पूर आल्यास दुष्काळ पडल्यास किंवा इतर कोणतेही नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास सरकार शेतकऱ्यांना सडळ हाताने मदत करते कर्जमाफी केली जाते. नव्याने कर्ज दिले जातात. वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात .शेतकऱ्यांना दिलासा दिला जातो.मात्र दादर गावच्या शेतकऱ्यांकडे सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. याची खंत ग्रामस्थांमध्ये आहे.कांदळवनाच्यामुळे दादर गावच्या ग्रामस्थांचे उपजीविकेचे साधन हिरावून घेतले आहे.याचा विचार करण्यात यावा अशी विनंती खासदार धैर्यशील पाटील जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांना ग्रामस्थांकडून निवेदन देऊन केली आहे.
दादर गावच्या शेत जमिनीवर वन विभागाच्या शिक्का मोर्तब करण्याचा प्रयत्न चालू आहे तो थांबवावा नाहीतर वीस हजार लोकसंख्या असलेल्या दादर गाव देशोधडीला लागेल असेही दादर गावच्या ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.शासनाने आमचे जमिनी बाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी शासनाने दादर गावच्या ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घ्यावे.भविष्यात आमच्या २३०० एकर जमिनी पुन्हा वापरा खाली येतील यादृष्टीने प्रयत्न करावेत अशी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करावी अशी मागणी ही दादर गावच्या ग्रामस्थांनी केले आहे.
यावेळी दादर गावचे एम. के. सर, ए. बी. पाटील, स. रा. म्हात्रे, अभिनंदन पाटील, सुनीता जोशी, मोहन पाटील, धनाजी पाटील,पांडुरंग पाटील, सतीश जोशी, दिलीप ठाकूर,विवेक जोशी, संजीव पाटील, गजानन पाटील, नंदकुमार ठाकूर, रमाकांत ठाकूर, ज्ञानदेव पाटील, रामचंद्र घरत आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ हजर होते.
