अमुलकुमार जैन
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील विविध विभागात भ्रष्टाचार चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, चार शिक्षकांचे प्रलंबित पगार काढण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच घेताना अमित राजेश पंडया, (वय ४७ वर्षे, उप शिक्षक, प्रथामिक शाळा जाताडे, ता. पनवेल सध्या कार्यरत समन्वयक प्राथमिक शिक्षण विभाग, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग, जि. रायगड. रा.- रूम क्रमांक A-1203, बारावा माळा, नीलसिद्धी इन्फिनिटी, सेक्टर 11, खांदा कॉलनी तालुका पनवेल जिल्हा रायगड. (वर्ग 3) मूळ राहणार – अलिबाग-रायगड) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जुन्या मुंबई-पुणे हायवेवर खालापुर फाटा, ता. खालापुर येथे ताब्यात घेतले असून याबाबत खालापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात तक्रारदार हे शिक्षक म्हणुन कार्यरत असुन, तक्रारदार व त्यांच्या सोबतचे इतर तीन शिक्षक यांचे माहे जुन/२०२४ व जुलै/२०२४ या कालावधीचे वेतन अदा करणेबाबतचे आदेश रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयाकडुन निघणेकरीता लोकसेवक अमित राजेश पंड्या यांनी ४०,०००/- रूपये लाचेची मागणी करीत असलेबाबत तक्रार प्राप्त झाली होती.
तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग रायगड यांच्या कार्यालयाकडे केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणीच्या वेळी दि. ०४/०९/२०२४ रोजी १९.१० ते १९.५७ वाजण्याचे दरम्यान तक्रारदार यांचेकडे पनवेल बस स्थानक येथे ४०,०००/- रूपये लाचेची मागणी करून लाचेची रक्कम तात्काळ स्विकारण्याचे मान्य केले. त्यानंतर दि. ०४/०९/२०२४ रोजी रात्री पावणे नऊ वाजता लोकसेवक अमित पंडया यांचेविरूध्द सापळा आयोजित केला असता, लोकसेवक यांना संशय आल्याने त्यांनी लाचेची रक्कम स्विकारली नाही. त्यामुळे त्यादिवशी सापळा स्थगित करण्यात आला. त्यानंतर दिनांक १८/०९/२०२४ रोजी १७.४५ वाजता जुन्या मुंबई-पुणे हायवेवर खालापुर फाटा, ता. खालापुर येथे सापळा आयोजित केला असता, लोकसेवक अमित पंड्या यांना तक्रारदार यांचेकडून ४०,०००/- रूपये लाचेची रक्कम स्विकारताना पंचासमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
सदर कारवाई ही लाच लुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे परिक्षेत्र अधीक्षक सुनील लोखंडे, अप्पर अधीक्षक महेश तरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक शशिकांत पाडावे, सहाय्यक फौजदार अरूण करकरे, पोलिस हवालदार महेश पाटील, पोलिस नाईक सचिन आटपाडकर, चालक पोलिस हवालदार सागर पाटील यांच्या पथकाने केली आहे.
पुन्हा शिक्षण विभाग चर्चेत
जिल्हा परिषदमधील शिक्षण विभाग हा नेहमीच चर्चेत असलेला विभाग आहे. बदली, अनुकंपा भरती यासारख्या विषयात नेहमी अर्थकारण होत असल्याचे समोर आले आहे. आता पुन्हा एकदा शिक्षण विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.
| विशेष म्हणजे पोलिसांनी पकडलेला लोकसेवक अमित राजेश पंड्या हा उपशिक्षक असून तो गेल्या काही वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात काम करीत असून अमित पंड्या याची त्याच्या नियुक्ती असलेल्या जागेवर त्वरित पाठवण्याची सूचना कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी तीन महिन्यांपूर्वी प्राथमिक शिक्षण अधिकारी पूनिता गुरव यांना केली असून सुद्धा त्यांनी कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष केले होते. अमित पंड्या यांना जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागात प्रती नियुक्तीवर कोणाच्या वरदहस्त होता याचीही चौकशी करणे गरजेचे आहे. या प्रकरणात कार्यालय प्रमुख म्हणून प्राथमिक शिक्षण अधिकारी आणि इतर अधिकारी, कर्मचारी यांची चौकशी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. |
