• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरणमधील बांधकाम परवानगीची फेरपडताळणी व बेकायदा बांधकामांच्या चौकशीची मागणी

ByEditor

Sep 20, 2024

घनःश्याम कडू
उरण :
उरण पालिकेत कायदा धाब्यावर बसवून बांधकाम परवाने दिल्याचे अधिकृत सूत्रांकडून समजते. या सर्व बांधकाम परवान्यांची फेरपडताळणी व बेकायदा बांधकामांच्या चौकशीची मागणी सामाजिक संघटनाकडून करण्यात आली आहे.

पालिकेत बांधकाम परवाना विभागामध्ये ऑनलाइन बांधकाम परवाने मंजूर करणे बंधनकारक आहे. परंतु ऑफलाइन पद्धतीने बांधकाम परवाने मंजूर केल्याचे समजते. त्याची सखोल चौकशी होणे अपेक्षित असल्याचे पालिका वर्तुळात बोलले जाते. बांधकाम परवान्याशी संबंधित सर्व मूळ कागदपत्रे यांची सखोल चौकशी केली तर नक्कीच बोगस कागदपत्रांचा घोटाळा उघड होईल. बांधकाम परवान्यांशी संबंधित असलेल्या या प्रकरणात पालिकेच्या काही निवृत्त अधिकारी व कर्मचार्‍यांसह बांधकाम व्यावसायिक आणि विकासकांचा समावेश आहे. हे बांधकाम परवाने फेरपडताळणीत बेकायदेशीर आढळून आल्यास या सर्व संबंधितांसह मिळकतदार आणि कर्ज देणार्‍या बँकाही अडचणीत येणार आहेत.

उरण शहरात नव्याने बांधकाम उभारण्यास परवानगी देताना खोटी कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने पॉवर ऑफ ऍटर्नी संबंधित व्यक्ती मयत होऊनही जोडून दिली आहे. तसेच एफएसआय वाढवून मिळण्यासाठी रहदारीचा रस्ता व नालेही विकासकांच्या घशात घालण्याचे काम पालिका अधिकारी वर्गानी केल्याचे पालिका कर्मचार्‍यांनी नाव न छापण्याच्या अटीवर माहिती दिली. या मोठमोठ्या इमारतींना परवानगी देताना यापुढे त्याचे दुष्परिणाम काय होतील याचाही विचार केलेला दिसत नाही.

अशाच प्रकारे नियमांचे उल्लंघन करून देण्यात आलेल्या परवानगीमुळे इमारती उभ्या करताना पालिकेच्या नाल्यावरच मेनगेट व ड्रेनेजच्या टाक्या बांधल्याचे दिसत आहे. याबाबत अधिकारी वर्गाकडे तक्रार करूनही ते याबाबत कोणतीच कारवाई सोडा साधी चौकशी करण्याचेही सौजन्य दाखवीत नाहीत. यावरून अधिकारी वर्गांचे विकासकाबरोबर आर्थिक साटेलोट असल्याने ते याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत.

उरण नगरपरीषद हद्दीमध्ये दाटीने वर्दळ असलेल्या रस्त्यालगत सार्वजनिक गटारावर बांधकाम पार्कींग नाही, मुख्य रस्त्यापासून नियमाप्रमाणे कायद्याने बंधनकारक मार्जीन सोडलेले नाही. सेफ्टी झोनमध्ये नगरपरीषद हद्दीमध्ये विना परवानगीने इमारतींचे 4 ते 5 मजली इमारतींची बांधकामे उभी रहात आहेत. बांधकाम विभागातील अधिकारी वर्गाच्या चौकशीची लेखी मागणी करूनही याकडे दुर्लक्ष करून सदर अधिकारी निवृत्त होऊनही आजही नगरपालिका कार्यालयात दररोज अधिकारी वर्गांच्या केबिनमध्ये बसून ढवळाढवळ करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

शहराच्या मध्यवस्तीतील, मोक्याच्या बाजारपेठेत अलीकडे समोरील जागा सोडून बांधकामे न करता झालेली बांधकामे समोरील जागेवरही केली गेली असल्याचे दिसत आहे. परंतु ही रस्त्यावर खेटून उभारलेली बांधकामे पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पाडली गेली नाहीत. त्याचीही पालिका आयुक्तांनी चौकशी करावी. यात दोषी आढळणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांवर कारवाई करावी आणि संबंधित बेकायदा बांधकामे पाडून बाजारपेठेचा श्‍वास मोकळा करावा, अशीही मागणी होत आहे. अन्यथा याविरोधात सामाजिक संघटना जनहित याचिका दाखल करून कारवाईची मागणी करणार असल्याचे समजते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!