अब्दुल सोगावकर
सोगाव : अलिबाग तालुक्यातील चोंढी येथील मांडवा लायन्स क्लबचे पदाधिकारी अनिल जाधव यांच्या पत्नी डॉ. अरुंधती जाधव यांचे शनिवार, दि. २१ सप्टेंबर रोजी पहाटे ५ वाजता चोंढी येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाबाबत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पार्थिवावर चोंढी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
डॉ. अरुंधती जाधव यांचे माहेर हे चोंढी येथील नार्वेकर कुटुंबातील होते. त्या महाराष्ट्र राज्य विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आत्या, तर प्रसिद्ध उद्योजक सुरेश नार्वेकर, रमेश नार्वेकर यांच्या बहीण होत्या. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी व अंत्यसंस्कारावेळी किहीम सरपंच पिंट्या गायकवाड, आरडीसी बँकेचे प्रदीप नाईक, अनिल म्हात्रे, अलिबाग एव्हरग्रीन इलेक्ट्रॉनिक्सचे मालक विजय वनगे, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, तसेच अलिबाग व मांडवा लायन्स क्लबचे पदाधिकारी, वैद्यकीय, राजकीय व सामाजिक तसेच इतर क्षेत्रातील मान्यवरांसह चोंढी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यांच्या पश्चात पती, मुलगी, जावई, असा परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी सोमवार, दि. ३० सप्टेंबर २०२४ रोजी होणार आहेत, तर उत्तरकार्य बुधवार, दि. २ ऑक्टोबर २०२४ रोजी चोंढी येथील राहत्या घरी होणार आहेत.
