रायगड : स्वच्छ भारत मिशन-ग्रामीण व शहरी यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून दि. २ ऑक्टोंबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस (SBD) म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने स्वच्छता ही सेवा मोहीम दि.१४ सप्टेंबर ते दि. २ ऑक्टोंबर २०२४ या कालावधीत राबविण्यात येत आहे. या वर्षीच्या स्वच्छता ही सेवा २०२४ साठी स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता ही थीम निश्चित केली आहे. या मोहिमेंतर्गत रायगड जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता मिशन विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले यांच्या मार्गदर्शनाखाली आवास समुद्र किनारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

यावेळी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जयवंत गायकवाड, सुरेश पाटील, रविकिरण गायकवाड, सुनील माळी, ग्रुप ग्रामपंचायत आवास सरपंच अभिलाषा राणे, ग्रामविकास अधिकारी जयेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य, सागरी सीमा मंच यशोधन जोगळेकर, निमेश परब , बा. ना. हायस्कुलचे विद्यार्थी व शिक्षक, तसेच आवासमधील ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जयवंत गायकवाड म्हणाले की, चांगल्या स्वच्छता सवयी अंगिकाराव्या यासाठी स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता महत्त्वाची आहे. आता नागरिकांनी माझा कचरा माझी जबाबदारी या भूमिकेतून घरच्या घरी ओला व सुका कचरा वेगळा करून पर्यावरणपूर्वक स्वच्छता करण्याला प्राधान्य द्यावे. जल, जंगल, हवा, जमीन ही राष्ट्रीय संपत्ती आहे. त्याचे स्वच्छता राखत जतन करावे.

जिल्ह्यात नांदगाव मुरुड, किहीम,वरसोली,नागाव बीच अलिबाग,नागाव बीच, उरण बीच या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. जिल्हा पाणी व स्वच्छता कक्ष ,सबंधित ग्रामपंचायत,सागरी सीमा मंच, NSS विद्यार्थी, मेरी टाईम बोर्ड, ग्रामस्थ, एनजीओ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी प्रतिज्ञा, रॅली, श्रमदान, मानवी साखळी उपक्रम राबविण्यात आले.
