१ कोटीच्या माणगांव बस स्थानक रस्त्याचे भूमिपूजन
सलीम शेख
माणगाव : आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. संपूर्ण कोकणाला भेडसावणाऱ्या मुंबई महामार्गाचे काम येत्या ८ ते १० महिन्यात पूर्ण करण्याची जबाबदारी आमची असून आणि ते पूर्ण करणारच असे आश्वासन माणगांव येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे माणगांव येथे बसस्थानक अंतर्गत रस्त्याचे संपूर्णपणे काँक्रीटीकरण करण्याच्या कामाच्या भूमिपूजन सोहळ्यामध्ये नवनिर्वाचित एसटी महामंडळाचे अध्यक्ष, शिवसेना पक्षप्रतोद आ. भरत गोगावले यांनी दिले.
माणगांव येथील बस स्थानकात मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी तुंबून राहत होते. गेल्या अनेक वर्षांपासून या खड्यांमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. ही गैरसोय दूर करण्यासाठी युवासेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे यांनी आ. भरत गोगावले यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या मागणीला प्रतिसाद देत आ. भरत गोगावले व महिला बाल विकास मंत्री ना. आदिती तटकरे यांनी १ कोटी २ लाख ८४ हजार रुपयांच्या कामाचे भूमीपूजन केले. यावेळी आ. भरत गोगावले म्हणाले की, माणगांव बस स्थानक आणि आगारातील ज्या काही समस्या असतील त्या तातडीने पूर्ण करण्यात येतील. प्रवाशांसाठी थंड शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येईल. माणगांव आरटीओ कार्यालय सुरू व्हावे यासाठी रिक्षा संघटना अध्यक्ष संजय (अण्णा) साबळे यांनी दहा वर्षांपासून पाठपुरावा केला होता. त्यांची ही मागणी आ. गोगावले यांनी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. माणगांव जवळील मुगवली येथे प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) आणि ट्रॅक व मूलभूत सुविधा सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी लागणारा निधी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात येईल. आधी आरटीओ कामासाठी दक्षिण रायगडमधील जनतेला अलिबाग व पेण येथे जावे लागत होते. हे कार्यालय झाल्यास दक्षिण रायगडमधील सहा ते सात तालुक्यातील वाहनचालक व मालकांना लाभ मिळणार आहे. ही मागणी मंजूर झाल्याने रिक्षा चालकांनी समाधान व्यक्त केले.
माणगांव आणि इंदापूर महामार्गावरील या बायपास मार्गाची निविदा निघाली असून लवकरच ते काम सुरू करण्यात येणार आहे, असे सांगून हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन आ. गोगावले यांनी दिले. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लवकरच बैठक बोलवण्यात येणार आहे. यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या महामार्गाचा पाहणी दौरा केला होता. त्यावेळी तातडीने या महामार्गावरील खड्डे बुजविण्यात आले होते. अजूनही ते काम सुरू असून लवकरच ते पूर्ण होऊन या महामार्गवरील प्रवाशांचा प्रवास सुखकर व आरामदायी होईल असे सांगितले. नवीन एस टी बस प्रवाशांच्या सेवेत माणगांव येथे दिल्या जाणार असल्याचे देखील यावेळी आ. गोगावले यांनी यावेळी सांगितले. तसेच या कामाचे उदघाटक म्हणून पुढील वेळी आम्ही दोघेही मंत्री म्हणून उद्घाटनाला येऊ, असा विश्वास यावेळी आ. गोगावले यांनी व्यक्त केला. या बस स्थानकाच्या कामासाठी युवासेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे यांनी पाठपुरावा केल्याने ना. आदिती तटकरे व आ. भरत गोगावले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यानंतर महिला व बाल विकास मंत्री ना. आदिती तटकरे यांनी सांगितले की, माणगांव बस स्थानक हे बारामती बस स्थानका सारखेच सुसज्ज व आधुनिक करण्यात येईल. यासाठी यापूर्वीच ९ कोटी ६२ लाख रुपयांचा आराखडा सादर करण्यात आला आहे. तो ही लवकरच मंजूर झाल्यास सामान्य प्रवाशांची गैरसोय दूर होऊन आरामदायी प्रवास करण्यास मदत होईल. या बस स्थानकाच्या बामधकांसाठी सुमारे ४ कोटी आणि आगारासाठी ६ कोटी इतका निधी खर्च करण्यात येणार आहे. याचबरोबर म्हसळा, श्रीवर्धन, तळा, रोहा, गोरेगाव या बस स्थानकाच्या सुशोभीकरणासाठी लवकरच निधी उपलब्ध करावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे सांगितले. यापूर्वीच महिलांना एस टी प्रवासात ५०% सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांची संख्या वाढून एस टी महामंडळाला नफा झाला आहे.
या कार्यक्रमाला शिसवेना प्रवक्ते ऍड. राजीव साबळे, जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, रा. कॉ. जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष केकाणे, जिल्हा महिला संघटीका निलिमा घोसाळकर, युवासेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे, भाजप युवमोर्चा अध्यक्ष निलेश थोरे, रा. कॉ. कोकण प्रवक्ता सायली जाधव, जेष्ठ नेते शेखर देशमुख, रा. कॉ. तालुकाध्यक्ष काका नवगणे, निजामपूर सरपंच राजाभाऊ रणपिसे, भाजप तालुकाध्यक्ष गोविंद कासार, रा. कॉ. महिला अध्यक्ष संगीता बक्कम, माजी नगराध्यक्ष योगीता चव्हाण, शिसवेना शहरप्रमुख सुनील पवार, नगरसेवक सचिन बोंबले, शर्मिला सुर्वे, उणेगाव माजी सरपंच राजेंद्र शिर्के, एस. टी. अधिकारी व कर्मचारी वर्ग, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
