अशोक शेडगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची नितेश पाटील यांची मागणी
हुतात्मा स्मारकात २ वर्षे बांधकाम साहित्य धूळ खात पडून; स्मारकचा अपमान
गुन्हा दाखल न झाल्यास आमरण उपोषण करणार
विठ्ठल ममताबादे
उरण : तालुक्यातील ग्रामपंचायत पिरकोन हद्दीमधील मौजे पाणदिवे येथील हुतात्मा स्मारक येथे अशोक शेडगे या व्यक्तीने जल जिवन मिशन या योजनेच्या कामाचे बांधकाम साहित्य गेले २ वर्षांपासून ठेवले आहे. सदरचे बांधकाम साहित्य ठेवण्यासाठी त्यांनी ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी घेतलेली नाही तसेच सदरचे हुतात्मा स्मारक ही पाणदिवे गावाचे मंदिर, प्रेरणास्थान आहे तरी सदर प्रेरणा स्थानामध्ये बांधकामाचे मटेरियल ठेवून सदर प्रेरणास्थानाचे गोडावूनमध्ये रूपांतर करण्यात आले व पाणदिवे गावाचे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न सदर ठेकेदार करित आहे.
सदर व्यक्तीला वारंवार सुचना देवूनही सदर व्यक्ती साहित्य काढत नाही. हुतात्मा स्मारकात बांधकाम साहित्य ठेवल्याने हुतात्मा स्मारकाची पडझड झाली आहे. हुतात्मा स्मारकाचे विद्रुपीकरण झाले आहे. या सर्व कारणामुळे सदर स्मारकाची दुरवस्था झाली आहे. हुतात्मा स्मारक हे स्वातंत्र्य सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक आहेत. देशाचा महत्वाचा ऐतिहासिक ठेवा आहेत. देशासाठी बलिदान दिलेल्या थोर समाज सुधारक, स्वातंत्र्य सैनिकांचे ते स्मारक आहेत. अशा पवित्र ठिकाणाचा उपयोग नको त्या गोष्टीसाठी होत असल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे सदर व्यक्ती विरोधात हुतात्मा स्मारकाचा अपमान केल्या प्रकरणी गुन्हा नोंद करावा. संबंधित व्यक्तीवर कारवाई न केल्यास हुतात्मा स्मारक पाणदिवे येथे २५ सप्टेंबर २०२४ रोजी म्हणजेच हुतात्मा दिनी आमरण उपोषण करण्याचा इशारा पिरकोन ग्रामपंचायतचे सदस्य तथा तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष नितेश पाटील यांनी प्रशासनाला दिला आहे. या संदर्भात ग्रामपंचायत सदस्य नितेश पाटील यांनी उरणचे तहसीलदार उद्धव कदम, पिरकोन ग्रामपंचायतचे सरपंच कलावती पाटील व उरण पोलीस स्टेशन येथे पत्रव्यवहार देखील केला आहे.
सध्या मी बाहेर आहे. संबंधित विषया संदर्भात मी माहिती घेतो. आमच्या कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना देतो. चुकीचे काही असेल तर त्यावर कारवाई करण्यात येईल.
-उद्धव कदम,
तहसीलदार, उरण