• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उद्यापासून अंगणवाडी सेविकांचं बेमुदत उपोषण

ByEditor

Sep 22, 2024

वेतनवाढीच्या मागणीसाठी पुन्हा उपोषणाचं हत्यार

मुंबई : अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनवाढ, दरमहा पेन्शन, ग्रॅच्युईटी देण्यात यावी, याबाबतचे प्रस्ताव महिला व बालविकास विभागाने महाराष्ट्र सरकारला सादर केले आहेत. यासंबंधी महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी कृती समितीला वारंवार दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी आणि शासकीय आदेश विनाविलंब निर्गमित करावे, अशी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. या मागणीसाठी अंगणवाडी कर्मचारी सभेचे राज्य पदाधिकारी नितीन पवार यांच्यासह कृती समितीचे प्रमुख नेते उद्या (दि.23) सोमवारपासून मुंबई येथील आझाद मैदान येथे बेमुदत उपोषण सुरू करणार आहेत.

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीतर्फे आंदोलन केल्यानंतर 23 व 24 सप्टेंबरपर्यंत प्रश्न न सुटल्यास राज्यातील एक लाख अंगणवाड्या बंद करून बुधवार 25 सप्टेंबर रोजी दोन लाख अंगणवाडी सेविका मदतनीस आझाद मैदान येथे स्वतःला अटक करून घेणार आहेत.राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री (अर्थ),उपमुख्यमंत्री (गृह), मंत्री, महिला बाल विकास यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंबंधी शासकीय निर्णय लवकर काढू, अशी वारंवार व ठिकठिकाणी आश्वासने दिली आहेत, परंतु,अद्याप शासकीय आदेश निघालेले नाहीत. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये कमालीचा असंतोष व प्रक्षोभ निर्माण झाला आहे.

लवकरच निवडणूक आचारसंहिता सुरु होणार असल्यामुळे, शासकीय निर्णय निघतील की नाही, याबाबतीत त्या चिंताग्रस्त आहेत. यासंदर्भात अलीकडे कृति समितीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्याची १.९.२०२४ रोजी, ठाणे भेट घेतली होती. त्यात कबूल केल्याप्रमाणे यानंतर वीस दिवस उलटूनही अधिकारी वर्गासह याविषयी अद्याप मिटिंग झाली नाही. यापूर्वीही अनेक वेळा बैठका घेऊन, चर्चा करण्याचे शासनाने मान्य केल्यामुळे त्यावर विश्वास ठेवून कृति समितीने ठरलेली आंदोलने स्थगित केली आहेत. परंतु, प्रदीर्घकाळ आश्वासनाची पुर्तता न झाल्यामुळे अंगणवाडी कर्मचारी व कृति समितीच्या नेत्यांमध्ये नाराजी व चिंतेची भावना निर्माण झाली आहे. म्हणून याबाबत निर्णय करून घेण्यासाठी कृति समितीने नेते दि.२३.९.२०२४ पासून आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत उपोषण करत आहेत. तर २५.९.२०२४ रोजी, राज्यभर अंगणवाड्यांचा बंद ठेवून आझाद मैदानावर तीव्र निदर्शने व जेलभरो आंदोलन होणार आहे. शासनाने कृति समितीच्या नेत्यांशी विचारविनिमय करून मानधनवाढ, दरमहा पेन्शन व ग्रॅच्युईटी या संदर्भातील शासकीय आदेश विनाविलंब निर्गमित करावे, ही या आंदोलनाची मागणी आहे, असे नितीन पवार, यांनी कळवले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!