प्रतिनिधी
नागोठणे : भारतीय टेनिसबॉल क्रिकेट महासंघ, आंतरराष्ट्रीय टेनिसबॉल क्रिकेट फेडरेशन यांच्या संलग्नतेने तसेच युवा कार्य व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार, भारतीय शालेय खेळ महासंघ यांच्या मान्यताप्राप्त तसेच स्पोर्ट्स कोटामध्येही समाविष्ट असलेल्या टेनिसबॉल क्रिकेट या अधिकृत खेळाची महाराष्ट्र राज्य टेनिसबॉल क्रिकेट संघटना व नंदुरबार टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २३वी महाराष्ट्र राज्य ज्युनिअर गट मुले-मुली टेनिस बॉल क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन नंदुरबार येथील जी. टी. पाटील महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले होते. या स्पर्धेत महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यांतील खेळाडू सहभागी झाले होते. चार दिवसांपासून सुरु असलेल्या अटीतटीच्या लढतीत आज रायगड विरुद्ध धुळे सामान्यत अंतिम सामना खेळविण्यात आला. यामध्ये रायगड संघाने बाजी मारत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

या स्पर्धेतील रायगडचा पहिला सामना हा धुळे संघासोबत झाला. यावेळी रायगड संघाने १३ धावांनी धुळे जिल्ह्यावर विजय मिळविला दुसरा सामना रायगड विरुद्ध परभणी असा झाला. या सामन्यात रायगडने २४ धावांनी विजय मिळविला. रायगड संघाचा तिसरा सामना नंदुरबार विरुद्ध झाला. या सामन्यात रायगड संघाने ३ धावांनी विजय मिळविला. चौथा सामना (टॉप १६) रायगड वि. नाशिक झाला. त्यावेळी नाशिक संघाला ५ षटकात फक्त २० धावांवर रायगड संघाने रोखून ते आव्हान २ ओव्हरमध्ये बिनबाद पूर्ण केले आणि सुपर ८ मध्ये दिमाखात प्रवेश मिळवला.

सुपर ८ मधील पहिला सामना रायगड वि. सोलापूर या संघांमध्ये झाला. त्यावेळी रायगडने ५ ओव्हरमध्ये ५५ धावांचं आव्हान सोलापूरला दिले होते. मात्र सोलापूरचा संघ ३१ धावांत गारद झाला. या सामन्यात रायगडने २३ धावांनी विजय मिळवीत स्पर्धेत आपले वर्चस्व कायम ठेवले. सलग पाच सामने जिंकत रायगड संघाने उपांत्य सामन्यात धडक मारली. उपांत्य फेरीचा सामना रायगड वि. ठाणे असा झाला. त्यावेळी ठाणे संघाने ५ ओव्हरमध्ये २७ धावांचे आव्हान रायगडला दिले होते. ते फक्त २ ओव्हरमध्ये रायगड संघाने पूर्ण करून मोठ्या दिमाखात अंतिम सामन्यात प्रवेश केला.
अंतिम सामना रायगड वि. धुळे यांच्या रंगला. या सामन्यात धुळे संघाने प्रथम फलंदाजी करीत ५० धावांचे लक्ष रायगड संघाला दिले होते. यावेळी रायगडच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत ४ षटकातच ५० धावा ठोकून विजय संपादित करून प्रथम विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत मुलांमध्ये विजेतपद रायगड संघाने पटकावले, उपविजेतेपद धुळे संघाने तर तृतीय स्थान ठाणे संघाने मिळविले. तसेच मुलींमध्ये विजेतपद नाशिक, उपविजेते पद नागपूर तर तृतीय स्थान धुळे संघाने मिळविले.
या स्पर्धेत विजेतपद पटकावलेले रायगडचे खेळाडू खालील प्रमाणे :
राज बामुगडे, अश्मन महेंद्र म्हात्रे, कुणाल पाटील, ऋग्वेद मोरे, संस्कार देशमुख, कुणाल पाटील, हार्दिक म्हात्रे, आयुष दिघे, सुयश वाघमारे, विघ्नेश थिटे, विराज म्हात्रे, आयुष मनवे, पार्थ कोळी, सिद्धांत गुरव.
टीम प्रशिक्षक : महेश म्हात्रे, भरत गुरव
टीम व्यवस्थापक : जयदीप पाटील
या स्पर्धेत गुणवंत फलंदाज हा किताब रायगडच्या राज रोशन याने तर मुलींमध्ये संस्कृती (नागपूर) यांना देण्यात आला. उत्कृष्ट गोलंदाज हा किताब अनिकेत बोर्डे अहमदनगर व कोमल बडगुजर धुळे यांना देण्यात आला. तर अष्टपैलू हा किताब विनोद शिंदे (धुळे) व धनश्री काकड (नाशिक) यांना देऊन सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेचे बक्षीस वितरण एनटीडी समिती नंदुरबारचे उपाध्यक्ष मनोज रघुवंशी, पुष्पेंद्र रघुवंशी, प्राचार्य यशवंत महाविद्यालय यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्य संघटनेचे सचिव डॉ. मोहमद बाबर, जिल्हा सचिव डॉ. मयूर ठाकरे, भगुराव जाधव, विशाल पवार, भरत गुरव (सचिव,महाराष्ट्र लगोरी संघटना), मुकुंद झनकर आदी उपस्थित होते.
विजेतेपद मिळवलेले रायगडचे खेळाडू हे दि. १० ते १३ ऑक्टोबर रोजी सुंदरनगर, हिमाचल प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय ज्युनिअर टेनिस बॉल क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करतील.