सलीम शेख
माणगाव : शिवभक्तांच्या हृदयात आढळस्थान असणाऱ्या किल्ले रायगडला जाण्यासाठी माणगाव ते किल्ले रायगड दैनंदिन एसटी बस सेवेचे स्वप्न पूर्ण झाले आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष आमदार भरत गोगावले यांच्या आदेशाने माणगाव ते किल्ले रायगड अशा दैनंदिन बस सेवेचे उद्घाटन गुरुवार दि. ३ ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजता माणगाव बस स्थानक येथे करण्यात आले. यावेळी शिवसेना युवासेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे,आगार व्यवस्थापक छाया कोळी, वाहतूक नियंत्रक विनोद हाटे, युवासेना कार्यकर्ते समीर तेटगुरे, आकाश महाडिक, सुरज सांगले, संतोष भोरावकर, मेकॅनिक नितीन तेटगुरे, सचिन उभारे व प्रवासी उपस्थित होते.
माणगाव ढाळघर फाटा, होडगाव, जांभूळवाडी, ताम्हाणे, पळसगाव, पुनाडेवाडी, पाचाड, किल्ले रायगड (रोपवे) असा या एसटी बसचा जाण्यायेण्याचा मार्ग असणार आहे. दररोज माणगाववरून सकाळी ८:१० वाजता, दुपारी १:१५ व रात्री ७:१० वाजता ही बस सुटणार असून किल्ले रायगडकडून सकाळी ९:२० वाजता, दुपारी २:२५ वाजता, सकाळी ५:४५ वाजता ही बस सुटणार आहे. या बसला माणगाव ते रायगड असा प्रवास करण्यासाठी एक तासांचा वेळ लागणार आहे. शिवभक्त, विद्यार्थी, पर्यटक, प्रवासी यांच्या सेवेकरता ही दैनंदिन एसटी बस सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार असून सर्व शिवप्रेमींनी या बस सेवेचे स्वागत करून समाधान व्यक्त केले आहे. यावेळी माणगाव ते किल्ले रायगड दैनंदिन एसटी बस सेवा सुरू केल्याबद्दल युवासेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे यांनी महामंडळाचे अध्यक्ष आमदार भरत गोगावले यांचे आभार व्यक्त केले.
