अमोल पेणकर
रोहे : भारतात दोन देवस्थानांना पोलिस मानवंदना देण्याची प्रथा, परंपरा ब्रिटीश काळापासुन सुरू आहे. त्यापैकी एक आहे रायगडवासियांचे श्रध्दास्थान आणि रोह्याचे ग्रामदैवत श्री धाविर महाराज. गुरुवारी मंगलमय वातावरणात विधिवत देवघटी बसले आणि धावीर महाराजांच्या नवरात्रोत्सवास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.
रोहे शहराच्या पश्चिम बाजुला हनुमान टेकडीच्या पायथ्याशी श्री धाविर महाराजांचे सुंदर आणि भव्य मंदिर आहे. मंदिरामध्ये गाभाऱ्यात श्री धाविर महाराज, कालिका माता, बहिरीबुवा वाघबाप्पा मागे तीन वीरा यांचे स्थान आहे. मंदिराबाहेर महाराजांचा अंगरक्षक चेडा देवाचे स्थान आहे. महाराजांना विधिवत देवघटी बसविताना रोहेकरांनी मंदिरात मोठी गर्दी केलेली. “हे धाविर महाराजा समस्त रोहावासिय ग्रामस्थांनी श्रध्देने आणि पारंपारीक पध्दतीने तुझा नवरात्रोत्सव मांडला आहे”, “या उत्सवामध्ये आमच्या हातुन चांगली सेवा होईल..काही चुका सुध्दा होतील, पण महाराजा हा उत्सव गोड मानून घे” तुझ्या गावाला संकटापासून दूर ठेव” असे देवस्थानचे पुजारी वरणकर यांनी श्री धाविर देवस्थानचे विश्वस्त, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेकडो धाविरभक्तांच्या उपस्थितीत देवाकडे गाऱ्हाणे मांडले आणी अक्षतांची उधळण देवावर होत ग्रामदैवत श्री धाविर महाराजांच्या उत्सवास मोठ्या उत्साहात शुभारंभ झाला. गोंधळयांची आरती, “विविध वाद्य” आणि घंटानादाने आसंमंत दुमदुमून टाकणाऱ्यां मंगलमय वातावरणात ग्रामदैवताची महाआरती संपन्न झाली.
यावेळी मंदिरात विश्वस्थ मंडळाचे अध्यक्ष प्रशांत देशमुख, कार्यवाह मकरंद बारटक्के, उत्सव समितीचे अध्यक्ष मयुर पायगुडे आदींसह ट्रस्ट आणि उत्सव समितीचे पदाधिकारी आणि प्रमुख मान्यवर मंडळी मंदिरात उपस्थित होती.