गणेश पवार
कर्जत : अमेरिकेच्या पेस्टल सोसायटीने भारतीय कलाकार पराग बोरसे यांना २०२४ सालचा बहुमोल समजला जाणारा “फ्लोरा बी गुफिनी मेमोरियल” पुरस्कार जाहीर केला होता. नुकताच मॅनहॅटन, न्यूयॉर्कमध्ये एका आलिशान समारंभात कर्जत शहरातील भारतीय चित्रकार पराग बोरसे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. तर ‘फ्लोरा बी गुफिनी मेमोरियल’ पुरस्कार विजेते कर्जत शहरातील भारतीय चित्रकार पराग बोरसे यांना अमेरिकेतील चित्रकारांसह मराठी भाषिक चित्रकार यांनी चित्रकलेचे धडे देण्याची विनंती केल्याने न्यू जर्सीच्या पेस्टल सोसायटीने मेडिसन हाऊस, २५, कुक एव्हेन्यू, मेडिसन, न्यू जर्सी येथे एका पेस्टल पोर्ट्रेट कार्यशाळेसाठी पराग बोरसे यांना आमंत्रित केले होते.
भारतीय चित्रकार पराग बोरसे यांनी चित्रप्रक्रिया समजून घेण्यासाठी व शिकण्यासाठी भाग घेतलेल्या मराठी भाषिक व अमेरिकन असे एकूण १४ विद्यार्थ्यांना पराग बोरसे यांना ज्या चित्रामुळे ‘फ्लोरा बी गुफिनी मेमोरियल’ पुरस्कार प्राप्त झाला त्या लाल रंगाचा पगडी परिधान केलेल्या व मोठ्या मिशा दाढी असलेल्या भारतातील महाराष्ट्र राज्यातील एका गावकर्याच्या चित्राचे प्रात्यक्षिक देत अमेरिकन चित्रकारांना चित्रकलेचे धडे दिले. यावेळी भारतीय चित्रकार पराग बोरसे यांच्या प्रात्यक्षिकाने सर्व विद्यार्थी प्रभावित झाले. पराग बोरसे यांच्याकडून भारतीय संस्कृतीबद्दल अधिक जाणून घेण्यास विद्यार्थ्यांची उत्सुकता दिसत होती.