३३ वर्षीय महिलेचा डेंग्यूने मृत्यू
बेजबाबदार डॉक्टरांवर कारवाई करणार का? नागरिकांचा सवाल
गणेश पवार
कर्जत : नेरळ ग्रामपंचायत हद्दीत डेंग्यूने डोके वर काढले असून सात रुग्णांपैकी दोन रुग्णांचा बळी गेला आहे. या घटनेने प्रशासन खडबडून जागे झाले असून काही दिवसापूर्वी जुनी बाजारपेठेतील एका तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना नेरळमध्ये दोन ऑक्टोबर रोजी डेंग्यूने महिलेचा मृत्यू झाला आहे. सदर माहिलेला दोन लहान मुले असल्याने तिच्या म्रुत्युमुळे नेरळमध्ये सर्वत्र शोक व्यक्त होत आहे.
नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील जुनी बाजारपेठ येथील राहणारे नामांकित व्यक्ती रफिक अत्तार यांचा २५ वर्षीय मुलगा मुस्तफा उर्फ राजू रफिक अत्तार याचा डेंग्यु सदृश आजाराने तेरा सप्टेंबर २०२४ रोजी मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच नेरळ बोंबील आळी येथे दोन, नेरळ टेपआळी दोन, जुनी बाजारपेठेतील एक असे रुग्ण डेंग्यू सदृश आजाराने बाधीत असल्याचे समोर आले आहे. नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राकडून त्या भागातील एकूण ९४ घरे प्रमाणे ५२० जणांचे सर्वेक्षण करण्यात येऊन त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणी करीता पाठवण्यात आले होते. आरोग्य विभागाच्या सुचनेनंतर नेरळ ग्रामपंचायत व कोल्हारे ग्रामपंचायतीचे सरपंच महेश विरले यांच्या संयुक्त माध्यमातून नेरळ परिसरात औषध व धुर फवारणीची मोहीम सुरू करण्यात आली असतानाच हेटकर आळी येथील सोहम अपार्टमेंटमधील रहिवाशी ३३ वर्षीय योगीनी आमित पोतदार हिचा डेंग्यू सदृश आजारावरील उपचारा दरम्यान दोन ऑक्टोबर रोजी रात्री म्रुत्यु झाल्याची घटना घडली आहे. याबाबत नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राकडून अचंबित करणारी माहिती समोर आली आहे. नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या टिमने सदर महिलेच्या घरी जाऊन कुटुंबाची भेट घेतली असता, पंचवीस सप्टेंबर रोजी महिलेचे हात पाय दुखून थंडी वाजत असल्याने खाजगी डॉक्टर शेवाळे यांच्याकडे उपचार केले. दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी सदर महिलेला थोडा ताप सुद्धा येऊ लागला तसेच तिचा रक्तदाबही कमी होत असल्यामुळे सदर महिलेला नेरळमधील खाजगी डॉक्टर शिरसाट यांच्याकडे उपचारासाठी नेले असता रूग्ण माहिलेला ताप व बीपी लो असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रूग्णाची चाचणी करून सदरचा रिपोर्ट घेऊन रुग्ण महिलेला नेरळ मधील खाजगी डॉक्टर कराळे यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. दि. २७ सप्टेंबर रोजी सदर रूग्णावर रिपोर्टनुसार डेंग्यू संशयित म्हणून डॉ. काराळे यांनी रूणावर पाच दिवस औषधउपचार केले. दि. १ ऑक्टोंबर रोजी रूग्णाचे छातीत दुखू लागल्याने ईसीजी काढण्यात आला त्यामध्ये थोडा बदल दिसुन आला होता. दि. २ ऑक्टोबर रोजी ही रूग्णाचे छातीत दुखू लागल्याने पुन्हा ईसीजी काढण्यात आला त्यामध्ये डॉ.कराळे यांनी त्याच दिवशी रूग्णाला बदलापूर येथील डॉ. राठोड यांचे खाजगी रूग्णालय उपचारासाठी पाठवण्यात आले. तर त्याच दिवशी रुग्णाला कल्याण येथील खाजगी रुग्णालय फोर्टीज येथ पाठविण्यात आले. तर फोर्टीज रुग्णालयात उपचार घेत असताना त्याच दिवशी रात्री पाहुणे बाराच्या दरम्यान रुग्णाचा मृत्यू झाल्याचे नांतेवाईकांकडून सांगण्यात आले आहे.
नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राकडून ज्यावेळी नेरळमध्ये डेंग्यू सदृश आजाराने दि. १३ सप्टेंबर २०२४ रोजी पहिली मृत्यूच्या घटनेनंतर नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अख्यारीत येणाऱ्या भागातील सर्व खासगी डॉक्टर डेंग्यू सदृश आजाराचा रूग्ण उपचाराठी आल्यास व लॅबना आपल्या लॅबमध्ये रक्त तपासणी रिपोर्टमध्ये डेंग्यू सदृश आजाराचे निदान झाल्यास या संदर्भात नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रास कळवावे असे लेखी नोटीसव्दारे सुचित केले असताना, डेंग्यू डेंग्यू सदृश आजाराने नेरळमधील महिलेचा दुसरा बळी गेल्याची घटना समोर आल्याने व सदर मृत महिलेच्या नातेवाईकांकडून समोर आलेली माहिती पाहाता, शासकीय नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लेखी नोटीसीचे गांभीर्य या खाजगी डॉक्टरांना नसल्याचे मात्र स्पष्ट होत आहे. शासन अशा बेजबाबदार डॉक्टरांवर कारवाई करणार का? असा सवाल कर्जतकरांकडून विचारण्यात येत आज आहे.
नेरळमध्ये बुधवारी रात्री डेंग्यूमुळे दुसरा बळी गेला ही खूप दुःखद घटना आहे. प्रशासन त्यांचे काम करतेय पण येथील खाजगी डॉक्टर हलगर्जीपणा करताना दिसत आहेत. आरोग्य प्रशासनाने खाजगी डॉक्टरांना नोटीस १९ सप्टेंबरला देऊनही या महिला रुग्णाबाबत खाजगी डॉक्टरांनी कुठलीच माहिती नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राला दिली नाही तरी अशा डॉक्टरांवर कारवाई व्हायला हवी.
अंकुश शेळके,
माजी प्रभारी सरपंच
