सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान व वरदाई चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांना सायकल वाटप
अभय पाटील
बोर्ली पंचतन : जोपर्यंत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळत नाही तोपर्यंत मी संसदेमध्ये मराठी भाषेतूनच भाषण करण्याचा संकल्प 2019 मध्ये जेव्हा पहिल्यांदा खासदार म्हणून निर्वाचित होऊन पहिले भाषण केले त्यावेळी केला होता, आता केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन सन्मान केला असून आपल्या मराठी भाषेचं सर्वोतोपरी असलेले ऐश्वर्य आपण सर्वांनी मिळून टिकवून ठेवू असे आवाहन खासदार सुनील तटकरे यांनी केले. श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन येथील विद्यालयामध्ये शिक्षण घेत असलेल्या इतर खेडेगावातील विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते.

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान व वरदाई चॅरीटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने जनता शिक्षण संस्थेच्या श्री. मोहनलाल सोनी विद्यालय व श्री. नानासाहेब कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालय बोर्ली पंचतन, ता. श्रीवर्धन विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या बोर्ली पंचतनच्या आजूबाजूच्या गावांतील विद्यार्थ्यांना प्रशालेत सायकल वाटप करण्यात आले. यावेळी जनता शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष तथा विश्वस्त सदस्य महमद मेमन, सचिव अनंत भायदे, खजिनदार उदय बापट, संचालक निशांत मोरे, कुमार गाणेकर, श्रीकांत तोडणकर, रमेश घरत, माजी सरपंच निवास गाणेकर, गणेश पाटील, ज्योस्त्ना हेडुकर, ज्योती परकर, माजी सभापती लाला जोशी, स्वाती पाटील, माजी उपसरपंच मंदार तोडणकर, चिंचबादेवी देवस्थान संस्था अध्यक्ष सुजित पाटील, प्रशासकीय अधिकारी संदीप पाटील, प्राचार्य बाबासाहेब यळमंते, पर्यवेक्षक रमजान पठाण तसेच परीसरातील पदाधिकारी, ग्रामस्थ, विद्यार्थी, पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या मनोगतामध्ये खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले की, दिघी बंदर विकास करण्यासाठी केंद्र सरकारने माझ्या मागणीवरून 40 हजार कोटी रुपये मंजूर केले असल्याचे त्यांनी सांगितले. दिघी परिसरात येणाऱ्या औद्योगिक वसाहतीमध्ये जेव्हा उत्पादन सुरू होईल तेव्हा आपल्या स्थानिक जनतेला रोजगार मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.