किरण लाड
नागोठणे : गेली दोन दिवस जिल्ह्यात मुसळदार पाऊस पडत असल्याने ठिकठिकाणी नदी, नाले, तलाव, ओढे पाण्याने तुडुंब भरून वाहत आहेत. बससेवा, वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. पुरपरिस्थीती निर्माण होऊन विद्यार्थ्यांचे येण्या, जाण्याचे मार्ग बंद होऊ शकतात या पार्श्वभूमीवर पुढची खबरदारी म्हणून तसेच संभाव्य धोके टाळण्यासाठी रायगड जिल्ह्याधिकारी डाॅ. योगेश म्हसे यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

भारतीय हवामान विभागाने रायगड जिल्ह्याला दि. 17 ते 21 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात गेली दोन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. नदी, नाले, ओढे, तलाव ओसांडुन वाहत आहेत. बससेवा, वाहतुक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. गावातुन, वाड्यांतुन, डोंगरातुन शाळेत शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे तसेच शिक्षक वर्गांचे हाल होऊ नये तसेच पुढील संभाव्य परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी रायगड जिल्हाधिकारी यांनी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
| सुट्टी जाहीर करण्यास विलंब मंगळवारपासून पावसाची संततधार सुरु असून जिल्ह्यात विविध ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. बुधवारी रायगड जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी शाळा, कॉलेजला सुट्टी जाहीर केली असली तरी सकाळ सत्रातील विद्यार्थी मात्र शाळांमध्ये पोहोचल्यावर त्यांना शाळेला सुट्टी असल्याचे सांगण्यात आले. मात्र मुसळधार पावसात आलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा घरी जाण्याकरिता पुराच्या पाण्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे विलंबाने जाहीर झालेल्या सुट्टीचा काही विद्यार्थ्यांना फटकाच बसला आहे. |
