• Fri. Jun 27th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

कपोली-श्रीवर्धनच्या लेकीचा SRD/NRD साठीचा प्रवास

ByEditor

Oct 22, 2024

अभय पाटील
बोर्ली पंचतन :
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांचेद्वारे दरवर्षी प्रजासत्ताक दिन परेड शिबिरांचे आयोजन करण्यात येते. या शिबिरात सहभागी होणाऱ्या स्वयंसेवकांना विविध निवड चाचणीला सामोरे जावे लागते. सुरवातीला विद्यापीठ स्तरीय एक दिवसीय चाचणी होते, मग राज्यस्तरीय ३ दिवसीय निवासी शिबीर आणि अंतिम फेरीत देशांतर्गत विभागस्तरीय १० दिवसाची निवासी शिबीर होतात त्यातून एन. आर. डी. साठीची निवड केली जाते. चाचणीमध्ये शारिरीक, सांस्कृतिक, बौद्धिक, संप्रेक्षण कौशल्य त्याचबरोबर विशेष कला गुणांचा समावेश असतो. विशेषतः स्वयंसेवकाचे परेड मधिल कौशल्य तपासण्यात येते.

एस.एन.डी.टी महिला विद्यापीठा संचलित महर्षी कर्वे आदर्श महिला महाविद्यालय श्रीवर्धनचे प्राचार्य डॉ. दत्तात्रय पांडुरंग राणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम आधिकारी प्रा. सुमित सुरेश चव्हाण यांच्या नेतृत्वात तृतीय वर्ष बी सी ए या शाखेमध्ये शिक्षण घेत असलेली कपोली बोर्ली पंचतन त.श्रीवर्धन येथील कु. साक्षी विजय कांबळे आणि श्रीवर्धन येथील कु. स्नेहा संतोष चौकर महाविद्यालयाच्या या दोन विद्यार्थिनींनी या शिबिरात सहभाग नोंदविला. त्यात कु. साक्षी विजय कांबळे या विद्यार्थिनीची राज्यस्तरीय पुर्व रिपब्लिक डे परेडसाठी निवड झाली होती.

महाराष्ट्र राज्य व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे दि. २६ सप्टेंबर ते दि. २८ सप्टेंबर २०२४ दरम्यान झालेल्या ३ दिवसीय राज्यस्तरीय पुर्व रिपब्लिक डे परेड चाचणीत कु. साक्षी विजय कांबळेची देशांतर्गत पश्चिम विभागस्तरीय पुर्व रिपब्लिकन डे परेड (Pre-RD Pared) साठी निवड झाली आहे. ही निवड एस. आर. डी. बाबत निश्चिती देते. एन.आर.डी. निवडसाठी देशांतर्गत पश्चिम विभाग स्तरीय पुर्व रिपब्लिकन डे परेड दहा दिवसीय शिबीराचे आयोजन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर मराठवाडा विद्यापीठ येथे दि. १२ नोव्हेंबर ते दि. २१ नोव्हेंबर २०२४ दरम्यान करण्यात आले आहे. साक्षीची राष्ट्रीय रिपब्लिक डे परेडसाठी निवड होईल आणि राष्ट्रपतींसमोर परेड करताना टीव्हीवर पाहण्याच्या अपेक्षेने तिचे आई-वडील, नातेवाईक, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थीनी सुखावले आहेत. राष्ट्रीय रिपब्लिक डे परेड निवडीसाठी श्रीवर्धन तालुक्यातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!