व्यावसायिक महिलांना प्रोत्साहन
मानसी मलकापूरकर विशेष महिला लघु उद्योजक, लहान उद्योजकांचे विशेष कौतूक
शशिकांत मोरे
धाटाव : तब्बल १८ वर्षाहून अधिक काळ महिला उद्योजकांना प्रोत्साहन देत त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री करण्यासाठी भव्य प्रदर्शन भरविणाऱ्या स्पंदन संस्थेच्या महिला उत्कर्ष मेळाव्याला शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शनिवार, २६ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबरपर्यंत सलग ३ दिवस भाटे सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात महिला उत्पादित वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनात ४१ स्टॉल होते. त्यात महिलांनी तयार केलेल्या आकर्षक मेणबत्या, पणत्या, इमिटेशन ज्वेलरी, शो पिस, बॅग, विविध प्रकारचे भाजणी पीठ, साड्या, ड्रेस मटेरियल, शोभिवंत वस्तू यांसह विविध वस्तूंची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. या प्रदर्शनात तब्बल ८ लाख रुपयांची उलाढाल झाली. व्यावसायिक महिलांना अधिक प्रोत्साहन मिळाले हे अधोरेखित झाले. अध्यक्षा स्नेहा अंबरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी छान नियोजन केले.
स्पंदन संस्था आयोजित महिला उत्कर्ष मेळाव्याचे उद्घाटन विज वितरण कंपनीच्या माजी अधिकारी आशा वागळे यांच्या हस्ते करण्यात आले होते. प्रदर्शन मेळाव्याची सांगता सोमवारी रात्री झाली. सलग ३ वर्षापासून यशस्वी महिलांचा विशेष सन्मान केला जातो. त्यानुसार मानसी मलकापूरकर (पूर्वाश्रमीची दीपा गुडेकर) यांना विशेष महिला लघु उद्योजक म्हणून सन्मानित करण्यात आले. गुडेकर यांनी साड्या, ड्रेस मटेरियलची सर्वाधिक विक्री करीत यशस्वी व्यवसाय केला. सुजाता धनवी यांना विशेष कलाकुसर तर शीतल शहा यांना विशेष आकर्षक सन्मान करीत संस्थेच्या अध्यक्ष स्नेहा अंबरे व पदाधिकाऱ्यांनी गौरवले. गार्गी जाधव, श्रावणी सावंत या लहानग्या उद्योजकांचे विशेष कौतूक स्पंदनच्या महिला पदाधिकाऱ्यांनी करत कौतुकांची थाप दिली. त्यांच्यावर सर्वांच्याच कौतूकाच्या नजरा जात होत्या. दोघींत प्रचंड उत्साह होता अशी प्रतिक्रिया स्नेहा अंबरे यांनी व्यक्त केली.
उत्कर्ष मेळाव्याला समस्त रोहेकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला. मेळावा यशस्वी होण्यासाठी अध्यक्ष स्नेहा अंबरे, ज्योती तेंडुलकर, अलका नांदगांवकर, विद्या घोडींदे, श्रद्धा कोर्लेकर, जयश्री धनावडे, प्रियांका कांबळे, सुविधा वाकडे, मुक्ता राक्षे, राखी पाटील, माधवी मोरे, रूपाली इंदलकर, रेखा खटावकर, धनश्री पवार, शीतल दांडगव्हाळ, सुवर्णा देसाई, दीपा कुरकुंडे, ऋतुजा भोसले, मॅनेजमेंट प्रतीक राक्षे, राकेश वाडके यांनी विशेष परिश्रम घेतले. दरम्यान, स्पंदन संस्थेच्या अध्यक्षा स्नेहा अंबरे यांनी शहरी, ग्रामीण भागातील महिलांना व्यवसाय करण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले. महिलांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीसाठी सातत्यपूर्ण प्रदर्शन मेळाव्याचे आयोजन केले हेच मेळाव्याचे यश असल्याचे पुन्हा एकदा ठळक झाले तर महिला उत्कर्ष मेळावा कमालीचा यशस्वी झाल्याचे समाधान महिलांनी व्यक्त केले आहे.
