राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष सूरज काझमी व अंतोरे उपसरपंचांसह अनेक तरुणांनी बांधले शिवबंधन
विनायक पाटील
पेण : पेण तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. दोन दिवसांपूर्वीच प्रसाद भोईर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करून आमदारकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांचे समर्थनार्थ पेण शहरात भव्यदिव्य रॅली काढून शिवसैनिक व समर्थकांनी जल्लोष केला.
आज शिवसेना तालुकाप्रमुख जगदीश ठाकूर व युवा सेनेचे योगेश पाटील यांच्या माध्यमातून पेण तालुक्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष सुरज काझमी, ग्रामपंचायत अंतोरे उपसरपंच प्रशांत पाटील, उद्योजक पवन कुंभार, देवव्रत पाटील, सुनील पवार, दिवाकर पाटील, सचिन पवार, मुजीब विश्वजीत जोगळेकर, अजय पवार, भाऊ पाटील, शादाब टिझवी, समाधान वाघमारे यांनी प्रसाद भोईर यांच्या उपस्थितीत मनगटावर शिवबंधन बांधून शिवसेनेची मशाल हाती घेतली. यावेळी प्रसाद भोईर, नरेश गावंड, अविनाश म्हात्रे, दीपश्री पोटफोडे, जगदीश ठाकुर, समीर म्हात्रे, योगेश पाटील आदींसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख जगदीश ठाकुर यांनी बोलताना सांगितले की, प्रवेशकर्त्या सर्व कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक देऊन आपल्या ज्या काही समस्या असतील त्या सोडविण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. आज राष्ट्रवादी युवक तालुका उपाध्यक्ष व अंतोरे उपसरपंच तसेच अनेक तरुणांनी आमच्या माध्यमातून पक्षात प्रवेश केला आहे आणि यापुढे अनेक पक्षप्रवेश होणार असल्याचे त्यांनी सांगितले.