घनश्याम कडू
उरण : राज्यासह देशभरातील दिवाळी सणाचे उत्साही वातावरण व तयारीची लगबग सुरू असतानाच नवी मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. उलवेमधील जावळे गावातील एका घरात गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात एक महिला व २ मुलांसह ३ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तसेच काही जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
गॅस सिलिंडरच्या स्फोटात मृत्यू झालेले तीन जण एकाच कुटूंबातील आहेत. स्फोट इतका भीषण होता की, दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये आईसह दोन मुलांचा समावेश आहे. मृतांमध्ये १५ वर्षांची मुलगी व ८ वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील उलवे येथील जावळे गावात बुधवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. एका किराणा मालाच्या दुकानामध्ये दोन सिलिंडर टाक्यांचा भीषण स्फोट झाला. या दुकानात छोटे सिलिंडर विक्रीसाठी ठेवले होते. या दुकानात पेट्रोलची सुद्धा विक्री होत असल्याची माहिती समोर आली आहे. दुकानात पेट्रोल असल्याने आग भडकली असल्याची शक्यता आहे. दिवाळीच्या तोंडावरच नवी मुंबईत घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दुकानात ठेवलेल्या ५ किलोच्या दोन सिलिंडरचा टाक्यांचा स्फोट झाल्याने ही दुर्घटना घडली आहे. स्फोटानंतर घराला आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले असून या स्फोटात दुकानाचेही नुकसान झाले आहे. या घटनेत कुटुंबातील एक जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
काही दिवसापूर्वीच चेंबूर येथील सिद्धार्थ कॉलनीतील चाळीमध्ये असलेल्या एका घराला भीषण आग लागली होती. पहाटेच्या सुमारास लागलेल्या या आगीमध्ये एकाच कुटुंबातील सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.