मयूर पारकर
दिवेआगर : बोर्ली पंचतन शहरातील मुख्य रस्त्यांवरच मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला आहे. मारुती नाका, गणेश चौक, बस स्थानक या परिसरात रस्त्यावर ही मोकाट गुरे बसलेली असतात. मोकाट जनावरांची संख्या प्रचंड वाढली आहे. मोकाट जनावरांमुळे रस्त्यावर अपघाताचा धोका वाढला असून, वाहनचालकांच्या अंगावर मोकाट जनावरे कधी धावून येतील याचा काही नेम नाही.

शहरातील बाजारपेठेसह मुख्य रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. अनेकवेळा मोकाट जनावरांमुळे वाहतूक कोंडी निर्माण होते. वाहचालकांना जीव धोक्यात घालून रस्त्याने वाहन चालवावे लागते. शहरातील रस्त्यावर ठिय्या मांडून बसणाऱ्या या मोकाट जनावरांना कोण लगाम घालणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. काही वेळेस तर ही जनावरे हॉर्न वाजवूनही उठत नसल्याने वाहन चालकांना वाहन सोडून रस्त्यावरील जनावरांना बाजूला करावे लागत आहे.
काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायतीकडून शहरात मोकाट जनावरांना बांधून ठेवण्याबाबत सूचना देण्यात आली होती. त्यानंतर या जनावरांच्या मालकांनी आपली जनावरे बांधून ठेवली. मात्र, पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ झाली आहे. तर कारवाई होत नसल्याने मालकही आपली जनावरे दिवसभर मोकाट सोडून देतात.