• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा जाहीरनामा; भुमिपूत्रांना नोकरी, मुलांना मोफत शिक्षण, धारावी प्रकल्पही रद्द करणार!

ByEditor

Nov 7, 2024

वृत्तसंस्था
मुंबई :
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या पक्षाचा जाहीरनामा जाहीर केला असून त्यात विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर करणे आणि धारावी पुनर्विकास प्रकल्प रद्द करण्याची ग्वाही देण्यात आली आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, बहुतेक आश्वासने विरोधी महाविकास आघाडीच्या एकंदर आश्वासनांचा भाग आहेत.परंतु, काही असे मुद्दे आहेत. ज्याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. राज्यातील विद्यार्थिनींना जसे शासनाच्या धोरणांतर्गत मोफत शिक्षण मिळत आहे, तसेच महाविकास आघाडीचे सरकार आल्यास पुरुष विद्यार्थ्यांसाठीही ते लागू केले जाईल, अशी ग्वाही ठाकरे यांनी दिली. महाविकास आघाडीजीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही स्थिर ठेवेल, असेही ते म्हणाले.

धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत उद्धव ठाकरे म्हणाले की, या प्रकल्पाचा मुंबईवर परिणाम होणार असल्याने तो रद्द केला जाईल. झपाट्याने होणारे नागरीकरण लक्षात घेऊन महाराष्ट्र आणि मुंबईतही गृहनिर्माण धोरण असेल, असेही ते म्हणाले. महाविकास आघाडीसत्तेत आल्यास कोळीवाडे आणि गावठाणांचा क्लस्टर डेव्हलपमेंट रद्द करण्यात येईल आणि रहिवाशांना विश्वासात घेऊन हे काम केले जाईल, असे ठाकरे म्हणाले. रोजगार निर्मितीसाठी आपला पक्ष काम करेल, असेही शिवसेना प्रमुखांनी सांगितले.

शिवसेना उबाठा पक्षाचे जनतेला अश्वासन

◾ प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य, देखणे आणि प्रेरणादायी मंदिर उभारणार.

◾ पुढच्या ११ वर्षात महाराष्ट्राचा प्राचीन, मध्यमयुगीन आणि आधुनिक इतिहास तसेच प्रगतीशील आणि पुरोगामी संस्कृतीचं दर्शन घडवणारी लेणी उभारणार.

◾ शेतकऱ्यांचे नुकसान होवू न देता गहू, तांदूळ, डाळ, तेल आणि साखर ५ जीवनावश्यक वस्तूंचे भाव ५ वर्षे स्थिर ठेवणार.

◾ महिलांना मिळणारे सरकारी अर्थसहाय्य वाढवणार.

◾ प्रत्येक पोलीस स्टेशन बरोबरीने स्वतंत्र २४x७ महिला पोलीस ठाणे सुरु करणार.

◾ अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविका यांच्या वेतनात वाढ करणार.

◾ प्रत्येक कुटुंबाला २५ लाखांपर्यंतची कॅशलेस मेडिकल ट्रीटमेंट उपलब्ध करून देणार

◾ महाराष्ट्रात जन्माला आलेल्या प्रत्येक मुलाला मुलींप्रमाणे मोफत शिक्षण देणार

◾ सरकारी कर्मचा-यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार.

◾ ‘विकेल ते पिकेल’ धोरणानुसार बळीराजाच्या पीकाला हमखास भाव मिळवून देणार.

◾ वंचित समूहांच्या हक्कांच्या रक्षणासाठी महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना करणार.

◾ धारावीकरांना त्यांच्या उद्योगांच्या सोयींसह राहते घर तिथल्या तिथे देणार.

◾ मुंबईतील आणि महाराष्ट्रातील भूमीपुत्रांच्या रोजगारासाठी जागतिक दर्जाचे आर्थिक व औद्योगिक केंद्र उभारणार.

◾ बारसू येथील रिफायनरी प्रकल्प रद्द करणार.

◾ मुंबईतल्या रेसकोर्सच्या जागेवर कुठलेही अतिरिक्त बांधकाम होऊ न देता ती जागा मुंबईकरांसाठीच मोकळी ठेवणार.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!