• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरणमध्ये काँग्रेसचा ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा

ByEditor

Nov 7, 2024

वार्ताहर
उरण :
राज्यात 20 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार केला जात आहे. त्यातच आता उरण विधानसभा मतदारसंघातून मोठी बातमी समोर येत आहे. मविआचे उमेदवार मनोहर भोईर यांना काँग्रेसने पाठींबा दिला आहे. यामुळे भाजपचे महेश बालदी यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे दिसून येत आहे.

उरण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसून आले होते. महाविकास आघाडीतून शिवसेना ठाकरे गट व शेतकरी कामगार पक्ष या दोन्ही घटक पक्षांचे उमेदवारी अर्ज कायम राहिले. त्यामुळे उरण विधानसभा निवडणुकीत ठाकरे गट, शेतकरी कामगार पक्ष आणि भाजप यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. त्यातच महाविकास आघाडीच्या जागावाटपात रायगड जिल्ह्यातील सात विधानसभेपैकी काँग्रेसला एकही उमेदवार न दिल्यामुळे रायगड जिल्ह्यामधील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी नाराज झाले होते. यानंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी मागील आठवड्यात 250 पदाधिकाऱ्यांसमवेत आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेस काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

अखेर उरण विधानसभा मतदारसंघातील मविआचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार मनोहर भोईर यांना आता काँग्रेसने जाहीर पाठींबा दर्शविला आहे. त्यामुळे आता मनोहर भोईर यांचे पारडे काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे भक्कम झाले आहे. आता त्यांची लढत शेतकरी कामगार पक्षाच्या प्रितम म्हात्रे आणि भाजपचे उमेदवार महेश बालदी यांच्यासोबत सोबत होणार आहे. या तिरंगी लढतीत नेमकी कोण बाजी मारणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!