• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पेण विधानसभा मतदार संघात पुन्हा एकदा कमळ फुलले

ByEditor

Nov 23, 2024

महायुतीचे उमेदवार रविंद्र पाटील ६० हजार ८०१ मतांनी विजयी

मिरवणूक काढून केला जल्लोष साजरा

विनायक पाटील
पेण :
191 पेण विधानसभा मतदार संघात कोणता उमेदवार बाजी मारेल आणि कोण असेल या मतदार संघाचा लोकप्रतिनिधी म्हणजेच आमदार, या गोष्टीची राजकिय चर्चा गेली महिनाभर सुरु असतानाच आज विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्या नंतर पेण विधानसभा मतदार संघात पुन्हा एकदा कमळ फुलले असुन महायुतीचे भाजपाचे आमदार रविंद्र पाटील यांनी पुन्हा एकदा आपल्या मतदार संघात विजयी पताका फडकावली आहे. याबाबत महायुतीचे विजयी उमेदवार रविंद्र पाटील यांना विचारले असता महायुतीने आणि भारतीय जनता पार्टीने या राज्यात जे धोरणात्मक निर्णय घेऊन नागरिकांच्या हिताची कामे केली आहेत, त्याची ही पोचपावती आज मला पेण विधनसभा मतदार संघातील मतदारांनी विजयी करून दिले असल्याने मी त्यांचे मतदारांचे आभार मानतो असे सांगितले.

पेण विधानसभा मतदार संघात महायुतीचे रविंद्र पाटील, शेकापचे अतुल म्हात्रे आणि शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे प्रसाद भोईर यांच्यात प्रमुख लढत झाली. प्रसाद भोईर आणि अतुल म्हात्रे हे महाविकास आघाडीतील घटकपक्षांचे उमेदवार असले तरी त्यांच्यातील वरिष्ठ स्तरावरील मतभेदांमुळे दोघेही एकमेकांविरोधात निवडणुकीला सामोरे गेले आणि याचा फायदा महायुतीचे उमेदवार रविंद्र पाटील यांना झाला असल्याची चर्चा संपूर्ण मतदार संघात केली जात आहे. विजयी उमेदवार रविंद्र पाटील यांना या निवडणुकीत. 1 लाख 24 हजार 631 मते मिळाली असुन 60 हजार 810 मताने आघाडी घेतली आहे तर उद्धव ठाकरे गटाचे प्रसाद भोईर यांना 63 हजार 821 मते तर शेकाप अतुल म्हात्रे यांना 29 हजार 191 मते तर अभिनव भारत पक्षाचे मंगल पाटील यांना 2266 तर वंचित बहुजन आघाडीचे देवेंद्र कोळी याना 1701 तर बसपासाचे अनुजा साळवी याना 1241 तसेच अपक्ष विकास बागुल यांना 1203 तर नोटाला 2473 मिळाली आहेत.

पेण मतदारसंघात प्रसाद भोईर आणि अतुल म्हात्रे या दोघांची मते पाहता या दोघांपैकी एक उमेदवार असता तर दोघांची मते एकत्र केल्यास महाविकास आघाडीचा विजय निश्चित असता अशी चर्चा ऐकायला मिळत होती. परंतु याचा फायदा महायुतीचे रवींद्र पाटील यांना होऊन मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.

मतमोजणी पुर्ण होताच महायुतीच्या उत्साही कार्यकर्त्यां कडून ढोल ताशाच्या गजरात पेण शहरातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी खासदार धैर्यशील पाटील, आमदार रविशेठ पाटील, कौसल्या पाटील, नीलिमाताई पाटील, वैकुंठ पाटील, मिलिंद पाटील, प्रितमताई पाटील, डी. बी. पाटील, प्रभाकर म्हात्रे, मंगेश दळवी, निवृत्ती पाटील, अनिरुद्ध पाटील, ललित पाटील, निळकंठ म्हात्रे, विवेक जोशी, गणेश पाटील आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!