घन:श्याम कडू
उरण : रेवस रेड्डी सागरी महामार्ग प्रस्तावित संयुक्त मोजणीबाबत शुक्रवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी उपविभागीय अधिकारी पनवेल येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या संदर्भात संबंधित विभागातील शेतकऱ्यांना याची कोणतीही माहिती देण्यात आली नसून त्यांना अंधारात ठेवून सदर बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

शासनाकडून रेवस रेड्डी सागरी महामार्गासाठी जमीन संपादित करण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. या पुढील कार्यवाही करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर बैठक शुक्रवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी दुपारी ११ वाजता उपविभागीय अधिकारी विभाग पनवेल येथे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीबाबत या रस्त्यासाठी संपादीत करण्यात येणाऱ्या चाणजे गावचे शेतकरी/भूधारक अथवा सामाजिक कार्यकर्ते, करंजा ग्रामस्थ मंडळ, तसेच कोंढरी ग्रामस्थ मंडळ अशा कोणालाही सदर बैठकीचे निमंत्रण देण्यात आलेल नाही. मात्र सदरील पत्र सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्यामुळे उजेडात आले आहे. सदर बैठकीबाबत सर्वांना अंधारात ठेवण्यात आले असल्याने चाणजे गावचे शेतकरी वर्गाकडून नाराजीचा सूर उमटत आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात कटकारस्थान आखण्यात येत असल्याबद्दल शंका व्यक्त होत आहे.
याबाबत तहसीलदार उद्धव कदम यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनीही याबाबत आपल्याला कल्पना नसून मला तुमच्याकडून माहिती मिळाली असल्याचे सांगितले. रेवस रेड्डी सागरी महामार्गासाठी प्रस्तावित संयुक्त मोजणीबाबत होणाऱ्या बैठकीचे निमंत्रण जर संबंधित शासकीय अधिकारी अथवा बाधीत शेतकऱ्यांना दिले जात नसेल तर त्यांना अंधारात ठेवून बैठक घेण्याचे कारण गुलदस्त्यात असल्याचा संशय शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.