घन:श्याम कडू
उरण : भूमी अभिलेख कार्यालय उरण येथील कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार व अरेरावीपणामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. कर्मचाऱ्यानी मनमानी कारभार व अरेरावी बंद करावी, नागरिकांची कामे सुरळीत व्हावी व त्यांना वेळेवर कागदपत्राची पूर्तता व्हावी अन्यथा त्याविरोधात सर्वसामान्य जनतेच्यावतीने सामाजिक संघटना रस्त्यावर उतरतील असा इशारा प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.
भूमी अभिलेख कार्यालय उरण येथे अनेक दिवसापासून कर्मचाऱ्यांच्या गलथानपणामुळे, मनमानी कारभारामुळे, अरेरावीपणामुळे व वेळेवर कागदपत्रांची पूर्तता होत नसल्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. साधारण, तात्काळ व अती तात्काळ मोजणी करायची असल्यास सहा महिने किंवा वर्षभरानंतर मोजणी होते. क- प्रत आठ दिवसात मिळण्याऐवजी महिना दिली जात नाही. वारसाना व खरेदी-विक्रीचे फेरफार वेळेत होत नाही. जमीनचे वर्ग बदल करण्यासाठी एक-एक महिना कागदपत्रे मिळत नाही. त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.
सदर कार्यालयातील भोंगळ कारभाराची चौकशी करून नागरिकांना होत असलेल्या त्रासापासून मुक्तता द्यावी, अशी मागणी सामाजिक संघटननांनी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. मागणी पूर्ण न झाल्यास कार्यालयासमोर आंदोलन करेल अशा ईशाराही निवेदनातून देण्यात आला. याबाबत तहसीलदारांना निवेदन देऊन याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार आहे.