सलीम शेख
माणगाव : श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात मला कमी मिळालेले मतदान हा ईव्हीएम घोटाळा असल्याचा आरोप मतदार संघातील बळीराज सेनेचे उमेदवार कृष्णा कोबनाक यांनी करून बांधवानो आतातरी जागे व्हा, लोकशाही धोक्यात आली असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
१९३ श्रीवर्धन विधानसभा मतदार संघाची सार्वत्रिक निवडणूक २० नोव्हेंबर रोजी होऊन या निवडणुकीचा २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात आला. या निकालावर आक्षेप घेत बळीराज सेनेचे उपाध्यक्ष व मतदार संघातील उमेदवार कृष्णा कोबनाक यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे कि, मी गेली २५ वर्षे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना पक्षाचे व १० वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये तसेच मागील २ वर्षे बळीराज सेना पक्षामार्फत विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असून या माध्यमातून असंख्य पदाधिकारी, मित्र, समाज व हितचिंतक माझ्या पाठीशी असून देखील १९३ श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातील श्रीवर्धन, म्हसळा, रोहा, तळा, माणगाव या पाच तालुक्यांतून फक्त ४९० मतदान मला मिळते हा ईव्हीएम घोटाळा नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित करून बांधवानो आतातरी जागे व्हा, लोकशाही धोक्यात आली आहे. असे सांगत समस्त जनतेला जागरूक राहण्याचा सल्ला दिला आहे.
