मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर दुसऱ्यांदा महायुतीची सरकार कधी स्थापन होणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून माघार घेतल्याने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यासह महायुतीमधून उपमुख्यमंत्री पद कोणाला मिळणार याबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
एकनाथ शिंदे यांची उपमुख्यमंत्री होण्याची इच्छा नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्यांच्या जागी शिवसेनेमधून उपमुख्यमंत्री पदासाठी कोणाला संधी मिळणार याबाबत देखील राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे. तर दुसरीकडे काही मीडिया रिपोर्ट्सनुसार जर एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारला नाही तर त्यांच्या जागी खासदार श्रीकांत शिंदे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, दादा भुसे किंवा दीपक केसरकर पैकी एकाला उपमुख्यमंत्री होण्याची संधी मिळू शकते असा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात येत आहे.
राज्याच्या राजकारणात प्रस्थापित करण्यासाठी एकनाथ शिंदे त्यांच्या जागी श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्री करू शकतात अशी चर्चा सुरु आहे. याचा एक महत्वाचा कारण म्हणजे ठाकरे गटाकडून विधिमंडळ पक्षनेतेपदी आदित्य ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे राज्याच्या राजकारणात श्रीकांत शिंदे यांना प्रस्थापित करण्यासाठी त्यांना उपमुख्यमंत्री करू शकतात.
जळगाव ग्रामीणचे आमदार गुलाबराव पाटील यांच्या देखील नावाची चर्चा उपमुख्यमंत्री पदासाठी होत आहे. गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघात याबाबत पोस्टर देखील लावण्यात आले आहे. तसेच राज्याचे माजी मंत्री उदय सामंत यांच्या नावाची देखील चर्चा सध्या उपमुख्यमंत्री पदासाठी जोराने सुरु आहे. उदय सामंत यांच्यासोबत दादा भुसे आणि दीपक केसरकर यांच्या नावांची देखील चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यामुळे जर एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारला नाहीतर शिवसेनेकडून उपमुख्यमंत्री पदासाठी कोणाला संधी मिळणार हे पाहावे लागेल.
