• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

भारतीय चलनी नोटा व नाण्यांचे डिझाईनकर्ते वसंत गावंड काळाच्या पडद्याआड

ByEditor

Dec 5, 2024

घन:श्याम कडू
उरण :
उरणमधील सुप्रसिद्ध चित्रकार ‘टाकसाळ’ म्हणून प्रसिद्ध असलेले वसंत लडग्या गावंड यांचे सोमवार, दि. २ डिसेंबर रोजी वयाच्या ८२व्या वर्षी उरण येथील रहात्या घरी निधन झाले. वसंत गावंड यांनी आपल्या देशातील चलनामध्ये असलेल्या अनेक नोटा व नाण्यांना डिझाईन केले होते.

वसंत लडग्या गावंड उरण तालुक्यातील आवरे गावचे सुपुत्र होते. हिंदुस्थानच्या विविध चलनी नाण्यांवर जी सुंदर व आकर्षक चित्रे असतात. त्याची डिझाईन स्टील व मास्टर पंचेस बनविण्याच्या कलेमध्ये हिंदुस्थानातील सर्वश्रेष्ठ आर्टिस्ट म्हणून गणले जाणारे तसेच जगातील सर्वोत्तम आठ आर्टिस्टमध्ये वसंत गावंड यांची गणना होत होती. त्यांनी अंत्यत हलाखीच्या परिस्थितीत आवरे येथील रायगड जिल्हा परिषद शाळेतून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी एन. आय. हायस्कूल उरणचे माजी मुख्याध्यापक कै. यशवंत किनरे सर यांनी त्यांना एन. आय. हायस्कूलमध्ये दाखल केले. त्यांची कलेची आवड लक्षात घेऊन किनरे सरांनी त्यांना जे. जे. स्कुल ऑफ आर्ट्स येथे इन्ग्रेव्हर आर्टिस्टसाठी प्रवेश घेण्यास भाग पाडले. किनरे सरांचा विश्वास वसंत गावंड यांनी सार्थ करून जगातील एक महान आर्टिस्ट झाले.

केंद्र सरकार एखाद्या महापुरुषाच्या किंवा ऐतिहासिक घटनेच्या स्मृतीप्रित्यर्थ नाणी (Commomorativ Coins) काढत असतात, त्यावेळी प्रथम त्या चित्राचे डिझाईन देशातील सर्व टाकसाळीतील कलाकारांकडून तयार करून घेतली जातात. त्यातून एका उत्कृष्ट नाण्याच्या डिझाईनची निवड केली जाते. वसंत गावंड यांनी आजपर्यत त्यांच्या सेवाकाळात छत्रपती शिवाजी महाराज, पंडित नेहरू, सरदार पटेल, इंदिरा गांधी, जयप्रकाश नारायण, राजीव गांधी आदी महापुरुषांची आणि नववे एशियन गेम्स, स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव, कॉमन वेल्थ गेम्स आदी महत्त्वपूर्ण घटनांवर आधारित डिझाईन तयार केलेली आहे. या डिझाईनची निवड करून भारत सरकारने त्यांची नाणी प्रसिध्द केली आहेत. एखाद्या कलाकाराकडून एक दोन जरी नाण्याची निर्मिती झाली तरी तो कलाकार कृतार्थ होतो. मात्र वसंत गावंड सरांच्या हातून प्रमुख राष्ट्रपुरुषांची अनेक नाणी तयार झालीत. यावरून ते किती महान कलाकार होते हे समजते.

वसंत गावंड हे २००२ साली मुंबई येथील टाकसाळीतुन (India Mint) आर्टिस्ट इनग्रेव्हर या क्लास वन पदारून निवृत्त झाले. त्यांना लहानपणापासून संगीत कलेची आवड होती. सुट्टी किंवा सणाच्या वेळी ते गावात येत तेव्हा नेहमी बुलबुल (बेंजो) वाजवत असायचे आणि तोही मोठा भोंगा लावून. त्याचप्रमाणे ते हार्मोनियम पण सुंदर वाजवायचे. त्यांना आम्ही शोले म्हणुन ओळखतो. ते त्यांच्या शोलेमधील अमिताभ-धर्मेंद्र जोडीच्या स्कुटरवरून. गावात येताना ते हिच स्कुटर घेऊन येत. आजही ती शोले स्कुटर त्यांच्याकडे आहे.

एप्रिल 2020 मध्ये त्यांनी तयार केलेल्या सर्व कलेचे जे. जे. स्कुल ऑफ आर्टस् येथे भव्य असे प्रदर्शन होणार होते. पण लॉकडाऊनमुळे ते शक्य झाले नाही. त्यांनी तयार केलेल्या कलाकृतीचे एखादे स्मारक त्यांच्या जन्मगावी तयार व्हावे ही इच्छा अनेक कलाप्रेमींनी व्यक्त केली आहे. असे महान कलाकार उरणचे सुपुत्र वसंत गावंड यांचे सोमवार, दि. २ डिसेंबर रोजी उरण बोरी येथे निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कारप्रसंगी मोठा जनसुदाय उपस्थित होता. वसंत गावंड यांच्या अचानक जाण्याने उरणमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!