प्रतिनिधी
अलिबाग : तालुक्यातील अलिबाग-रेवस मार्गावर रविवार, दि. ८ डिसेंबर रोजी संध्याकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास चोंढीजवळ डे-फार्म येथील वळणावर अलिशान लक्झरी बीएमडब्ल्यू कार वेगात गॅरेजमध्ये घुसल्याने तिघेजण गंभीर जखमी झाले. ही कार स्वतः मालक चालवीत असल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले.

जखमींमध्ये दुचाकी दुरुस्तीसाठी आलेल्या दोन ग्राहकांसह गॅरेज मालकाचा समावेश आहे. या अपघातानंतर काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर मांडवा सागरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वेळ न दवडता गंभीर जखमी झालेल्या तिघांना इतर वाहन चालकांच्या व सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविले. अलिबागचे पोलीस निरीक्षक श्री. साळे यांनी मांडवा पोलीस ठाण्याचे श्री. खोत यांच्यासह घटनास्थळी भेट देत सदर कार चालकाविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल असे सांगितले आहे.
अलिबाग-रेवस मार्गावर अलिबाग बाजूकडून रेवस बाजूकडे सदर कार जात असताना हॉटेल साई इन हॉटेलच्या पुढे डे फार्म जवळील वळणावर आली असता,
रस्त्याच्या कडेला असलेल्या रवी लक्ष्मण पाटील यांच्या दुचाकी गॅरेजच्या शेडमध्ये ही कार घुसली. यामध्ये गॅरेज मालक रवी पाटील (वय ५०, रा. धोकवडे- अलिबाग), मंगेश यशवंत म्हात्रे (वय ५२, रा. आगरसुरे-अलिबाग), सोनू मधु नाईक (वय ४५, रा. किहीम-अलिबाग) असे एकूण तिघेजण गंभीर जखमी झाले. जखमींना जिल्हा रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, कार चालक संदीप विलास गायकवाड याच्याविरुद्ध फिर्यादी नील यशवंत पाटील (रा. धोकवडे) यांनी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
कार चालक संदीप विलास गायकवाड याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून अंतिम तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलिस पुढील कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघाताबाबत अधिक तपास मांडवा पोलीस निरीक्षक श्री. भोई यांच्या मार्गदर्शनाखाली मांडवा पोलीस ठाण्याचे श्री. खोत हे करीत आहेत.