आगरी, कोळी समाजातील महिला उतरल्या रस्त्यावर
घनःश्याम कडू
उरण : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा आणि तितकाच आनंदाचा क्षण असतो. हा क्षण नवरा-नवरीप्रमाणे त्यांच्या कुटुंबीयांसाठीदेखील तितकाच आनंद अन् उत्साहाचा असतो. त्यामुळे एकदा का लग्नाची तारीख ठरली की, साखरपुडा पार पडल्यानंतर लग्नघरात सजावट, जेवण कसे असेल इथपासून ते नवरी-नवरीचे दागिने, कपड्यांपर्यंत सर्वांविषयी चर्चा सुरू होते. पण, लग्नात नवरा-नवरीच्या कपड्यांपेक्षा मानपानाच्या साड्यांचा विषय हा खूप मोठा असतो, विशेषत: आगरी-कोळी समाजात फक्त लग्नच नाही, तर प्रत्येक शुभ कार्यात महिलांना साडी देण्याची परंपरा आहे, जी मोठी खर्चिक परंपरा आहे. त्यामुळे लग्नापेक्षा यासाठी सर्वाधिक पैसा खर्च होतो जो प्रत्येकालाच परवडण्यासारखा नसतो. त्यामुळे ही परंपरा बंद करण्यासाठी उरणमधील कोपर गावातील महिलांनी अनोखे आंदोलन केले आहे. या आंदोलनाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये आगरी कोळी समाजाच्या काही महिला हातात बॅनर घेऊन रस्त्यावर उतरून, ’बंद करा, बंद करा साड्यांचा आहेर बंद करा’ अशी घोषणा देत प्रत्येक कार्यक्रमात साडी देण्याच्या परंपरेला विरोध दर्शवीत आहेत. दरम्यान, व्हिडीओच्या कमेंट बॉक्समध्येही अनेकांनी या आंदोलनास समर्थन दिले आहे.
लग्न समारंभासह प्रत्येक कार्यक्रमात साड्या देण्याच्या प्रथेस विरोध व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, आगरी व कोळी समाजातील शेकडो महिला हातात बॅनर्स घेऊन गावात प्रत्येक कार्यक्रमात साड्या देण्याच्या प्रथा परंपरेला तीव्र विरोध करीत आहेत. यावेळी काही महिलांच्या हातात बॅनरदेखील दिसत आहेत ज्यावर ’बंद करा, बंद करा, साड्यांचा आहेर बंद करा’ असे लिहिले आहे. तसेच, आंदोलनातील महिलादेखील तीच घोषणाबाजी करत आहेत. या कोपर गावातील महिलांनी आता एकमताने लग्न, पूजा, ओटभरणी अशा कार्यक्रमांना साड्या घ्यायच्या नाहीत, असा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे अनेकांनी स्वागतच केले आहे आणि अनेकांनी साड्यांप्रमाणे सोने, मेकअपवर यावरही बंदी आणली पाहिजे, अशी मिश्कील टिप्पणी केली आहे. एकूणच आगरी व कोळी समाजात प्रत्येक कार्यक्रमात मानपानाच्या साड्यांसाठी भरमसाट खर्च होतो, जो अनेक कुटुंबांना न परवडणारा असतो. त्यामुळे ही साडी देण्याची प्रथाच बंद व्हावी यासाठी महिलांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले आहे.