वैशाली कडू
उरण : रायगड जिल्ह्यांतील खालापूर तालुक्यामधील इर्शाळवाडी येथे दरड कोसळून झालेल्या जीवितहानी दुर्घटनेनंतर शासन खडबडून जागे झाले आहे. या घटनेची गांभीर्याने दखल रायगड जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी घेत, उरण तालुक्यांतील वेश्वी या गावाजवळील डोंगरावर असलेल्या मोठया दगडाच्या दरडी कोसळून वित्त व जीवितहानी होण्याचा मोठा धोकाआहे हे लक्षात घेत या दरडी सुरक्षितरित्या उतरविण्याचे आदेश त्यांनी नागरी संरक्षण दलाला दिले.
या आदेशाचे पालन करीत रायगड जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे डॉ. योगेश म्हसे यांच्या आदेशानुसार उरणचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रक एम. के. म्हात्रे व त्यांचे सर्व सहकारी आणि ग्रामस्थ यांच्या मदतीने या घसरलेल्या दगडाच्या मोठया दरडी सुरक्षितरित्या खाली उतरविण्यात आल्या असल्याने या दरडींचा घसरण्याचा धोका पूर्णपणे टळला आहे, त्यामुळे येथील आदिवासी बांधवांसह ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.