प्रतिनिधी
नागोठणे : येथील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयाच्या, राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आयोजीत निवासी श्रमसंस्कार शिबीराचा समारोप रा. से. यो. जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. तुळसीदास मोकल, डॉ. सी. डी. देशमुख महाविद्यालय, रोहा यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्र. प्राचार्य डॉ. दिनेश भगत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या प्रसंगी पिगोंडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संतोष कोळी हे उपस्थित होते.

प्रा. मोकल सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी शिबीरात चांगल्या लागलेल्या सवयी आत्मसात कराव्यात जेणेकरून तुम्हाला आयुष्य चांगले जगता येईल. प्रमुख पाहुणे व माजी सरपंच संतोष कोळी यांनी बोलताना सांगितले की, गेली तीन वर्षे रा. से. तो. विभाग प्लास्टिकमुक्त पिगोंडे गाव होण्यासाठी हा विभाग योगदान देत असल्याचे सांगत कार्यक्रम अधिकारी व शिबारार्थी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच पथनाट्य सादरीकरणातील विद्यार्थ्यांना रक्कमेच्या स्वरुपात बक्षीस दिले. प्र. प्राचार्य डॉ. दिनेश भगत सरांनी हे शिबीर चांगले पार पडल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. महाविद्यालय रा. से. योजना विभागाची सुरूवात शैक्षणिक वर्ष १९९८ साली याच गावातून झाली होती, याचे स्मरण या प्रसंगी त्यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अहवाल वाचन कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. श्रीकृष्ण तुपारे यांनी केले. बक्षीसांचे वाचन कार्यक्रम अधिकारी डॉ. मनोहर शिरसाठ यांनी केले. या शिबीरात पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी, जयवंत गायकवाड, प्राचार्य डॉ. संदेश गुरव, महेश गोसावी, प्रा. डॉ. विलास जाधवर, प्रा. सौ. निलम महाले, प्रा. डॉ. राणी ठाकरे, प्रा. हेमंत जाधव आदींनी मार्गदर्शन केले. या समारोप कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पायल गदमले हिने केले तर आभार प्रदर्शन भार्गव यशपाटील यांनी केले. हे शिबीर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्राचार्य डॉ. दिनेश भगत यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. श्रीकृष्ण तुपारे, डॉ. मनोहर शिरसाठ, नंदकुमार बावकर, सुमीत घासे, सारिका घासे, आयुष ताडकन आदींसह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व ग्रामस्थांनी मेहनत घेतली.
