• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

नवी मुंबई विमानतळावर रविवारी पहिले कमर्शियल लँडिंग होणार

ByEditor

Dec 28, 2024

घन:श्याम कडू
उरण :
नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. काही दिवसांपूर्वी या विमानतळावर वायुदलाचे सी 295 आणि सुखोई 30 या विमानांच्या यशस्वी लँडिंगनंतर आता रविवारी (29 डिसेंबर) पहिल्या व्यावसायिक विमानाचे लँडिंग होणार असल्याची माहिती समोर आली आहे. विमान सुरक्षा प्राधिकरणाचे परीक्षण अधिकाऱ्यांसह दिल्लीहून पहिले विमान लँडिंग रविवारी होणार आहे. त्यानंतर परीक्षण अधिकाऱअयांचे पथक मुंबईतून उडणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सच्या प्रवासी वाहतूक विमानातून प्रवास करत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरेल.

29 डिसेंबर रोजी व्यावसायिक विमानांच्या उड्डाणांची चाचणी पार पडेल. तर एप्रिल 2025 पासून विमानतळावरील पहिली धावपट्टी सुरू होईल. नवीन वर्षात पहिली धावपट्टी सुरू करण्यात येणार आहे आणि त्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. मार्च 2025 मध्ये हे विमानतळ नियमित प्रवासी सेवेसाठी सुरू होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन दरवर्षी 9 कोटी प्रवासी वाहतूक होईल. म्हणूनच मोठ्या शहारासाठी हा प्रकल्प लोकांना दिलासा देणारा आहे. याची क्षमता वाढविण्यासाठी परवानगीची कामे युद्धपातळीवर सुरु आहेत. पहिल्या टप्प्यात चार टर्मिनल असून 42 विमाने उभी राहतील. 5500 क्षमतेचे कार पार्किंग असेल. हे विमानतळ 11.04 किलोमिटर परिसरात उभे राहत असून दोन धावपट्या असतील.

मुंबई विमानतळाची सध्या 48 दशलक्ष प्रवासी प्रती वर्ष इतकी क्षमता असून वर्ष 2030 पर्यंत मुंबई महानगर प्रदेशातील अपेक्षित असलेल्या 100 दशलक्ष प्रवासी प्रती वर्ष हवाई प्रवास मागणीची पूर्तता करण्यासाठी नागरी विमान चालन मंत्रालयाने नवी मुंबईमध्ये ग्रीनफिल्ड विमानतळ विकसित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये रोजगार निर्मितीची मोठी क्षमता आहे. विमानतळ पूर्ण झाल्यानंतर कुशल आणि बिगर कुशल कामगारांसाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. लॉजिस्टिक्स, ट्रेडिंग-फॉरवर्डीग, हॉस्पिटॅलिटी, किंमती वस्तू उत्पादन, बीपीओ इत्यादी क्षेत्रांमध्ये रोजगार निर्मिती होईल.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!