• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

दिघोडे गावातील प्राथमिक शाळेची इमारत मोजतेय अखेरची घटका; विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका

ByEditor

Dec 28, 2024

अनंत नारंगीकर
उरण :
दिघोडे गावातील मुलांना शिक्षण घेता यावे, या उद्देशातून ग्रामस्थांनी एकदिलाने शासनाच्या देखरेखीखाली उभारलेली शाळेची इमारत अखेरची घटका मोजत आहे. ऐतिहासिक वारसा असलेल्या दिघोडे गावातील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत एकूण ११७ विद्यार्थी हे अभ्यासाचे धडे गिरवत असून शाळेच्या इमारतीच्या दुरवस्थेमुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. तरी राज्याचे नवनिर्वाचित शिक्षणमंत्री दादा भूसे यांनी सदर शाळेच्या इमारतीची पाहणी करून नव्याने इमारतीचे बांधकाम करण्यासाठी शासनस्तरावर पुढाकार घ्यावा अशी मागणी पालक वर्ग करत आहेत.

देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात दिघोडे गावातील रहिवाशांनी हिरीरीने सहभाग घेतला होता. १९३० सालच्या चिरनेर जंगल सत्याग्रहात दिघोडे गावातील स्वातंत्र्य सैनिक आलू बेमट्या म्हात्रे या शूरवीराला गोळी लागून वीरमरण प्राप्त झाले होते. अशा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या दिघोडे गावातील मूलांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी दिघोडे गावातील ग्रामस्थांनी एकदिलाने शासनाच्या देखरेखीखाली रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या इमारतीची उभारणी केली होती. या शाळेत शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी हे उच्च पदावर पोचून त्यांनी समाजहिताची कामे केली आहेत. आज त्याच प्राथमिक शाळेच्या इमारतीत पहिली ते चौथीच्या वर्गात एकूण ११७ विद्यार्थी अभ्यासाचे धडे गिरवत आहेत. अशा शाळेच्या प्रत्येक वर्ग खोल्यांची दुरवस्था झाली असून कौलारू छप्पर विद्यार्थ्यांच्या डोक्यावर पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊन, दिघोडे नावासह शाळेचे अस्तित्वही नाहीसे होण्याच्या मार्गावर आहे. तरी राज्याचे शिक्षणमंत्री दादा भूसे यांनी सदर शाळेच्या इमारतीची पाहणी करून नव्याने इमारतीचे बांधकाम करण्यासाठी शासनस्तरावर पुढाकार घ्यावा अशी मागणी पालक वर्गाकडून करण्यात येत आहे.

दिघोडे गावातील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची इमारत हि जिर्ण झाल्याने दिघोडे ग्रामपंचायत कार्यालयाच्या माध्यमातून शिक्षण विभागाकडे नव्याने इमारतीचे बांधकाम करण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे. तसेच उरणचे आमदार महेश बालदी यांच्याकडेही शाळेच्या इमारती संदर्भात मागणी केली आहे. त्यांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दर्शविला असून नव्याने इमारतीचे बांधकाम करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे.
-किर्तीनिधी ठाकूर
सरपंच दिघोडे ग्रामपंचायत

रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा दिघोडेमध्ये पहिली ते चौथीच्या वर्गात एकूण ११७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आज या शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाली असून विद्यार्थ्यांच्या डोक्यावरील छप्पर केव्हाही पडेल असे भयानक चित्र आहे. तसेच संगणक प्रशिक्षण वर्ग खोल्यांची देखील वाईट अवस्था आहे. तरी सदर शाळेच्या इमारतीचे लवकरात लवकर बांधकाम करण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा अशी मागणी आहे.
-नवनीत माळी
मुख्याध्यापक प्राथमिक शाळा दिघोडे

-मंदार पाटील, गाव अध्यक्ष

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!