मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांना सावधानतेचा इशारा
अनंत नारंगीकर
उरण : ३१ डिसेंबर रोजी थर्टीफर्स्ट मोठ्या प्रमाणात साजरा करण्यासाठी नागरीक हे आपल्या कुटुंबासह व मित्र परिवारासह घरा बाहेर पडतात. यावेळी काही वाहन चालक हे नियमांचे उल्लंघन करून तसेच दारु पिऊन आपली वाहने चालवत असतात. अशा वाहन चालकांवर करडी नजर ठेवण्यासाठी न्हावा शेवा वाहतूक शाखेच्यावतीने उलवे नोड आणि जेएनपीए बंदर परिसरात विशेष नाकाबंदी करण्याचा निर्णय नवीमुंबई पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार घेण्यात आला आहे. तरी थर्टीफर्स्टचा आनंद लुटण्यासाठी बाहेर पडणाऱ्या वाहन चालकांनी विशेष खबरदारी घ्यावी असे आवाहन न्हावा शेवा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जी. एम. मुजावर यांनी केले आहे.
न्हावा शेवा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जी. एम. मुजावर यांनी सांगितले की, न्हावा शेवा वाहतूक शाखेच्यावतीने रहदारीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावण्याचे उद्देशाने तसेच वाहन अपघातांना आळा घालण्यासाठी चालू वर्षी माहे डिसेंबर अखेर आत्तापर्यंत मोटर वाहन कायद्याखाली एकूण ३१,६०० वाहन चालकांविरुद्ध विविध कलमाखाली दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित वाहन चालकांना एकूण २,८८,३३,०००/- इतक्या रकमेचा दंड आकारण्यात आला असून सदर दंडापैकी एकूण रू. ४४,६६,७००/- इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली आहे.
सदर कारवाई अंतर्गत रस्त्यावर चुकीच्या ठिकाणी वाहने पार्क करून रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या १४,४५० वाहन चालकांविरुद्ध, विना हेल्मेट दुचाकी वाहन चालवणाऱ्या ९,५८५चालकांविरुद्ध, चार चाकी वाहन चालविताना सीटबेल्ट न वापरलेल्या ३१२५ वाहन चालकांविरुद्ध, तसेच लाल सिग्नल तोडणाऱ्या ९५० वाहन चालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
तसेच ३१ डिसेंबरचे पार्श्वभूमीवर न्हावा शेवा वाहतूक शाखेच्यावतीने संपूर्ण उलवे व जेएनपीटी परिसरात विशेष नाकाबंदी व तपासणी मोहीम आखण्यात आली असून कोणत्याही वाहनचालकाने मद्यप्राशन करून वाहन चालू नये व मद्य प्राशन करून वाहन चालविताना आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध कठोर दंडात्मक कारवाई सोबतच त्यांचे वाहन जप्ती अथवा वाहन परवाना निलंबन कारवाई करण्यात येईल असा इशारा देऊन, जेएनपीटी व उलवे परिसरातील वाहन चालकांनी महामार्ग तसेच अंतर्गत रस्त्यावर वाहने चालवताना स्वतःचे व इतरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मोटर वाहन कायद्याचे पालन करावे असे आवाहन न्हावा शेवा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जी. एम. मुजावर यांनी केले आहे.