गणेश पवार
कर्जत : राज्यात गाय-बैलांची कत्तल बंद असताना, रिक्षामधून ५० किलो वजनाचे गोमांस घेवून जाणाऱ्या दोन जणांना नेरळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना दि. ३० डिसेंबर रोजी सोमवारी दुपारचे तीन वाजण्याच्या सुमारास कर्जत-कल्याण राज्य मार्गावरील नेरळ पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे. नेरळ पोलिसांच्या सतर्कतमुळे गोमांस घेवून जाणाऱ्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, हे गोमांस नेरळ जवळील दामत गावातून आणण्यात आले असून, ते नवी मुंबई येथे घेवून जात असल्याचे समोर आले आहे.
एकीकडे थर्टीफर्स्टची धामधूम सुरू असताना दुसरीकडे कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात गोहत्त्या करून त्याचे मांस विक्रीसाठी तालुक्या बाहेर गुपचूप जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असुन, रस्त्यावर फिरणाऱ्या गोवंशिय जनावरांना पकडुन त्यांची हत्या करण्यात येत असून त्यांचे मांस हे विक्रीसाठी पाठवले जात असल्याची कर्जत नागुर्ले येथील घटना ताजी असताना, नेरळ येथून गोमांस खरेदी करून कर्जत कल्याण राज्य मार्गावरून नवी मुंबई येथे जात असल्याची घटना घडली आहे. तर नेरळ पोलिसांनी दृष्टी हॉटेल समोर रिक्षासह गोमांस ताब्यात घेतले आहे. ऑटो रिक्षा क्रमांक एमएच ४६ सी ०३६६ या वाहनात ५० किलो वजनाचे गोमांस हे चार वेगवेगळ्या पिशवीत बांधण्यात आल्याचे पोलिसांना सापडले आहे. यावेळी नवी मुंबई नेरूळ जवळील सेंट झेवेलीस स्कूल परिसरात राहणारे ५६ वर्षीय मुश्ताक शफीक पटेल व ४० वर्षीय फरमान इस्माईल शेख या दोन व्यक्तींना ऑटो रिक्षा सोबत नेरळ पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. दरम्यान हे गोमांस दामत गावातून मुसा भाई यांच्याकडून खरेदी केल्याची कबुली पकडण्यात आलेल्या दोन आरोपी व्यक्तींनी नेरळ पोलिसांना यावेळी दिली आहे. गोमांस यांसह ऑटो रिक्षा असा एकूण ९० हजाराच्या आसपास मुद्देमाल पोलिसांनी पकडला असल्याचे सांगण्यात आले आहे.
याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम १९९ चे कलम ५ (क) चे उल्लंघन ९ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास नेरळ पोलीस ठाण्याचे पोलिस अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार वाघमारे करीत आहेत. थर्टीफर्स्टच्या धामधुमीत कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात गोवंशिय जनावरांची कत्तल होत असल्याने आता गोरक्ष प्रेमींकडून याबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात असून अशा नराधमांवर कडक कारवाई केली जावी अशी मागणी करण्यात येत आहे.