मांडवा येथील नूतनीकरण केलेल्या शाळेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते होणार उद्घाटन
अब्दुल सोगावकर
सोगाव : दी लाइफ फाऊंडेशन ह्या सामाजिक संस्थेने मागील २५ वर्षांपासून ग्रामीण व शहरी भागातील शिक्षण आणि आरोग्य सुविधा सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले असून आता लँडमार्क ग्रुपच्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (CSR) उपक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा मांडवे चे यशस्वीरीत्या नूतनीकरण केले आहे. या नूतनीकरण केलेल्या शाळेचे गुरुवार दि. १६ जानेवारी २०२५ रोजी दुपारी ४:३० वाजता अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांच्याहस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात उद्घाटन करण्यात येणार आहे.

राजिप मांडवे शाळेच्या नूतनीकरणाची वैशिष्ट्ये:
- नवीन छत आणि लादी नूतनीकरण
- नवीन विद्यार्थी बेंच, शिक्षकांना आकर्षक टेबले आणि फर्निचर
- सहा नवीन संगणक, प्रिंटर आणि नवीन रॅक्स, सुसज्ज असलेली अत्याधुनिक संगणक प्रयोगशाळा,
- मुलांसाठी नवीन बांधणी केलेली शौचालये
- नवीन पंखे, ट्यूबलाइट्स आणि सर्वत्र नवीन वीज वायर,
- पूर्ण शाळेची रंग रंगोटी
दी लाइफ फाऊंडेशनच्या सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय विश्वस्त श्रीमती पूनम अजित लालवानी यांच्या मार्गदर्शनामुळे आणि नेतृत्वामुळे रा.जि.प. शाळा मांडवे शाळेचा कायापालट करणे शक्य झाला आहे. या शाळेच्या नूतनीकरण करण्याचा उपक्रम यशस्वी होण्यासाठी त्यांची असलेली दूरदृष्टी आणि मोठ्या प्रमाणात दिलेल्या योगदाना मुळे हे शक्य झाल्याचे दी लाइफ फाउंडेशनचे प्रकल्प व्यवस्थापक शिलानंद इंगळे यांनी यावेळी माहिती देतांना सांगितले.
या नव्याने नूतनीकरण केलेल्या रायगड जिल्हा परिषद शाळा मांडवेचे आज, दि. १६ जानेवारी २०२५ रोजी दुपारी ४:३० वाजता आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड आणि सरकारी अधिकाऱ्यांसह मांडवे शाळा कमिटीचे अध्यक्ष सुधीर पाटील व इतर मान्यवर, विद्यार्थी व त्यांचे पालक तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित राहतील, अशी अपेक्षा दी लाइफ फाउंडेशनने व्यक्ती केली आहे.
